नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन: सभापती दिपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न..

⚡सावंतवाडी ता.०५-: महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सावंतवाडी शहरात महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहून समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी केले.
श्रीमंत पावर्तीदेवी भोसले यांच्या सहकार्याने तसेच राजे आणि राण्यांनी जपलेल्या संस्कृती, सांस्कृतिक वैभव, हस्तकला, लाकडी खेळणी, मोती तलाव आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सावंतवाडी शहराच्या विकासाला चालना देण्यात आली आहे. महिलांनी सक्षमपणे उभे राहून समाजाच्या जबाबदार व कर्तबगार नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, असेही नगराध्यक्षा सौ. सावंत-भोसले यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दिपाली भालेकर म्हणाल्या की, सावंतवाडी शहरातील महिलांना काहीतरी नवीन व उपयुक्त शिकता यावे, या उद्देशाने १८ ते ४५ वयोगटातील महिला व युवतींसाठी दुचाकी व चारचाकी वाहन चालविणे, केटरिंग-कुकिंग, फॅशन डिझायनिंग, ज्युडो-कराटे तसेच संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होईल. वाहन चालविण्यामुळे महिलांना गतिशीलता मिळेल, ज्युडो-कराटेमुळे आत्मसंरक्षणाचे कौशल्य विकसित होईल, तर संगणक प्रशिक्षणामुळे त्यांना डिजिटल युगातील संधींचा लाभ घेता येईल, असा विश्वास सौ. भालेकर यांनी व्यक्त केला.
‘जागृती समाज प्रबोधन संस्था’, कोल्हापूरचे संदीप पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दिपाली भालेकर यांच्या पुढाकाराने व नियोजनामुळे सावंतवाडीतील महिलांसाठी हा उपक्रम यशस्वीपणे साकारत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे कर अधिकारी गजानन परब यांनी केले. आभार जागृती संस्थेचे संदीप पवार यांनी मानले.
