मालवण पं. स. सभेत दीपक चव्हाण यांचा संतप्त सवाल

⚡मालवण ता.०५-: मालवण – बेळणे मार्गावर वीज वितरण कंपनीमार्फत होत असलेले भूमिगत वीज वाहिनीचे काम अत्यंत नित्कृष्ट पद्धतीने व निष्काळजीपणाने होत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. या कामावर वीज अधिकाऱ्यांचा लक्ष नाही तसेच कामाबाबत वीज अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी व सूचना करून देखील ठेकेदाराकडून कामामध्ये कोणत्याही सुधारणा होत नसल्याने वीज अधिकारी ठेकेदाराचे जावई म्हणून काम करत आहेत काय ? असा संतप्त व सवाल बंडू चव्हाण यांनी वीज अधिकाऱ्यांना करत खडेबोल सुनावले.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सावंत, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, सीमा परुळेकर, मानसी भोगावकर, रिया बावकर, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, दीपक सुर्वे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी दीपक चव्हाण यांनी बेळणे मार्गावर होत असलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित करत वीज अधिकाऱ्यांना जाब विचारला. या कामात खोदाई करून त्यामध्ये वीज लाईन टाकल्यावर त्यावर वाळूचा थर टाकण्यात येत नसल्याचे दीपक चव्हाण यांनी सदर कामाच्या व्हिडीओ व फोटो यांच्या साहाय्याने सभागृहात समोर आणले. यावर सभापती सौ. चव्हाण यांनीही सदर कामावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी दिसून येत नसल्याचे सांगत वीज अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. ठेकेदार चुकीचे काम करत असताना वीज अधिकारी त्याच्यावर कारवाई का करत नाही असे दीपक चव्हाण यांनी विचारत भूमिगत वीजवाहिनीचे काम नियोजित आराखड्यानुसार झाले पाहिजे तसेच या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारा बरोबरच अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
या बैठकीत दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत प्रशासनाकडून माहिती घेत चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीच्या ट्रिगर १ मध्ये मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करून घेतल्याबद्दल पालकमंत्री नितेसश राणे, खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. दुष्काळी स्थितीचे सर्वांनी गांभीर्य ओळखून दुष्काळ निवारण करण्यासाठी काम करावे अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिल्या. तसेच संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी गावागावात दिलेल्या उद्दिष्टानुसार वनराई बंधारे बांधण्यात यावेत, यासाठी सर्वांनी श्रमदान करावे, प्रशासनाने ज्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आवश्यक आहे तेथे दुरुस्ती करावी, असेही सौ. चव्हाण यांनी सांगितले.
