शेती पंचनाम्यांसाठी मदतीचा हात; मालवण तालुक्यात १०० बंधारे उभारण्याचा संकल्प..

⚡मालवण ता.०५-:
पावसाचा खंड पडल्याने मालवण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतीचे नुकसान आणि आगामी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या शेती पंचनामे व विविध उपाययोजनांना सहकार्य करण्यासाठी भाजपा मालवण तालुका पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास भाजपा तत्पर असल्याचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. शेतीचे सरसकट पंचनामे सुरू असताना एकही शेतकरी या प्रक्रियेतून वंचित राहू नये, तसेच पंचनामे जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनासोबत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाच्या सूचना गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासह पंचनामे प्रक्रियेत आवश्यक ती मदत करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन भाजपा मालवण तालुक्याच्या वतीने १०० बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १० बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक साधनसंपत्तीचा वापर करून छोटे माती बंधारे, जलसंधारणाची कामे आणि पाणी अडविण्याच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून पाणी साठवणूक वाढविणे, भूजलपातळी उंचावणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे हा उद्देश असल्याचे चिंदरकर यांनी सांगितले.
प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास तालुक्यातील विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे, पाणीटंचाई आणि जलसंधारणाच्या कामांसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्धार भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, जि. प. सदस्य क्षमा हडकर, भाजपा महिला मोर्चा मालवण तालुका ग्रामीण अध्यक्ष ॲड. समृद्धी आसोलकर, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, अंशून गावडे, किशोर पेडणेकर, रोहेश गांवकर, सुमित सावंत, प्रवीण घाडीगावकर, प्रमिला पाताडे, सुशांत सुर्वे, सुशील गावडे, राजन आंबेरकर, संदीप हडकर यांच्यासह भाजपा मालवण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
