Headlines

इन्सुली गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी पोलीस पाटील कृष्णा सावंत यांची एकमुखाने निवड…

⚡बांदा ता.०४-:
येथील ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अध्यक्षपदी माजी पोलीस पाटील कृष्णा सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावातून समाधान व्यक्त होत असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
​कृष्णा सावंत यांनी इन्सुली गावचे पोलीस पाटील म्हणून तब्बल ३० हून अधिक वर्षे अविरत आणि उल्लेखनीय सेवा बजावली आहे. काही वर्षांपूर्वीच ते या पदावरून सेवानिवृत्त झाले. आपल्या प्रदीर्घ पोलीस पाटीलकीच्या कारकिर्दीत त्यांनी तंटामुक्ती समितीचे सचिव म्हणूनही अत्यंत चोख काम पाहिले होते. तत्कालीन अध्यक्ष, सचिव व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर इन्सुली गावाला शासनाचा मानाचा ‘तंटामुक्त गाव’ पुरस्कार व १० लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले होते. ​त्यांच्या याच अनुभवाची दखल घेत ग्रामस्थांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
​आपल्या निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना कृष्णा सावंत म्हणाले, “ग्रामस्थांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या काळात गावातील लहान-मोठे तंटे आपापसात सामोपचाराने गावातच मिटवून गाव वादमुक्त ठेवण्यावर भर राहील. यासाठी समितीतील सर्व सदस्यांना व ग्रामस्थांना सोबत घेऊन एकदिलाने कार्य केले जाईल.”
​या ग्रामसभेला गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सावंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page