मालवण (प्रतिनिधी)

नगरपरिषदेच्या वतीने ‘महास्वच्छता अभियान २०२६’, ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ व ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अभियानांतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, झाडी-झुडपांमध्ये तसेच संवेदनशील कांदळवन परिसरात साचलेला कचरा आणि प्लास्टिक कचरा हटविण्यात आला. नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत कचऱ्याचे संकलन करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
कांदळवन हे सागरी आणि किनारी पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्याचे संवर्धन व स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून कांदळवन परिसरात साचलेला प्लास्टिक व इतर कचरा हटवण्यावर या मोहिमेदरम्यान विशेष भर देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत नागरिक, स्वयंसेवक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या माध्यमातून ‘स्वच्छता ही सेवा’, ‘स्वच्छ शहर – सुंदर शहर’ आणि ‘कांदळवन व पर्यावरणाचे संवर्धन’ हा मोलाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
नागरिकांनी कचरा उघड्यावर, समुद्रकिनारी, सार्वजनिक ठिकाणी किंवा कांदळवन परिसरात न टाकता नगरपरिषदेच्या अधिकृत कचरा संकलन व्यवस्थेचाच वापर करावा, तसेच मालवण शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नेहमी सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.
