Headlines

कणकवलीच्या संभाव्य पाणीटंचाईवर आजपासून उपाययोजना करा

पाण्याची नासाडी रोखण्यासह छोटे बंधारे, बोअरवेल व पाणी वापराचे नियोजन करण्याची माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणी

कणकवली : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा उपलब्ध जलस्रोत, पाण्याची मागणी आणि भविष्यातील गरज यांचा विचार करून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे श्री नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कणकवली शहराला भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी शहर परिसरात पाणी अडविण्यासाठी छोटी-छोटी बंधारे उभारण्याची शक्यता तपासावी. पावसाचे पाणी साठविण्यासाठी योग्य ठिकाणांचा शोध घेण्याबरोबरच भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांवरही भर देण्यात यावा, अशी मागणी नलावडे यांनी केली.

उन्हाळा तीव्र झाल्यानंतर कणकवली नगरपंचायतीकडून शिवडाव धरणाचे पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी कणकवली शहरात पोहोचण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर पत्रव्यवहार करण्याऐवजी आतापासूनच संबंधित विभागांशी समन्वय साधून शिवडाव धरणाच्या पाण्याचे नियोजन करावे. भविष्यात शहराला किती पाण्याची गरज भासणार आहे आणि उपलब्ध पाणीसाठा किती आहे, याचा आढावा घेऊन प्रशासनाने पूर्वतयारी करावी, असे ते म्हणाले.

शहरातील नगरपंचायतीच्या विविध पाण्याच्या टाक्यांमधून ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. हजारो लिटर पाणी अशा प्रकारे वाया जात असताना त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाक्यांवर नियमित देखरेख ठेवून टाकी भरल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो होणार नाही, यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही नलावडे यांनी केली.

शहरातील अनेक नळजोडण्यांना कॉक नसल्यामुळे वापर झाल्यानंतरही पाणी वाहत राहते. त्यामुळे नगरपंचायतीने स्वतंत्र पथक नेमून शहरातील नळजोडण्यांची तपासणी करावी. ज्या ठिकाणी कॉक नाही, तेथे संबंधितांना ठरावीक मुदत देऊन कॉक बसविणे बंधनकारक करावे. त्याची अंमलबजावणी होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. पाण्याची ही नासाडी रोखल्यास उपलब्ध पाण्याचा अधिक काळ उपयोग करता येईल, असे नलावडे यांनी सांगितले.

पाणीटंचाई हा केवळ नगरपंचायतीचा विषय नसून संपूर्ण शहराचा प्रश्न आहे. कणकवली शहरातील सामाजिक संस्था, रोटरी क्लबसह अन्य संस्थांना सोबत घेऊन पाणी बचत आणि जनजागृतीचे उपक्रम राबवावेत. प्रशासनाने या संस्थांशी चर्चा करून त्यांना पाणी बचतीच्या मोहिमेत सहभागी करून घ्यावे. नागरिकांचा सहभाग मिळाल्यास संभाव्य पाणी संकटावर प्रभावीपणे उपाय करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

कणकवली शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजारांच्या आसपास आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत शहराला दररोज प्रत्यक्ष किती पाण्याची आवश्यकता आहे, याचा नगरपंचायतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. कुटुंबांची संख्या, प्रतिव्यक्ती पाण्याची गरज तसेच विविध कारणांसाठी होणारा पाण्याचा वापर याचा आढावा घेऊन शहराची एकूण पाण्याची गरज निश्चित करावी. उपलब्ध पाणी आणि प्रत्यक्ष गरज यामध्ये भविष्यात तफावत निर्माण होणार असल्यास त्यानुसार आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

कणकवली हे मध्यवर्ती शहर असल्याने येथे मोठ्या संख्येने हॉटेल्स, छोटी हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे व्यवसाय आणि टपऱ्या आहेत. या व्यवसायांनाही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे शहरातील मोठी व छोटी हॉटेल्स तसेच अन्य खाद्य व्यवसायांचा सर्वे करून त्यांना दररोज किती पाणी लागते, पाणी कुठून आणले जाते आणि त्याचा वापर कशाप्रकारे केला जातो, याची माहिती संकलित करावी. हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन संभाव्य पाणीटंचाईच्या काळात पाण्याच्या वापराबाबत नियोजन करावे, अशी मागणी नलावडे यांनी केली.

कणकवली शहर व लगतच्या ग्रामीण भागात काही पानथळ भाग असून, अशा ठिकाणी वर्षभर पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. या भागांचा सर्वे करून तेथे बोअरवेल, विहीर किंवा अन्य जलस्रोत निर्माण करता येतील का, याचा अभ्यास करावा. शासनाकडून निधी उपलब्ध करून योग्य ठिकाणी बोअरवेल घेता आल्यास भविष्यात त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य जलस्रोतांचा शोध घेऊन त्यावर आतापासूनच काम सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यानंतरही उन्हाळ्यात कणकवली शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. मे महिन्यात शहराच्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांवर मोठा ताण निर्माण झाला होता. यंदा पाऊस कमी पडल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच योग्य नियोजन करून पाण्याची नासाडी रोखण्याबरोबरच नवीन जलस्रोत निर्माण करण्याच्या उपाययोजना कराव्यात.

संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. प्रशासन, नागरिक, सामाजिक संस्था आणि व्यावसायिक यांनी एकत्रितपणे यावर उपाययोजना कराव्यात. नगरपंचायत प्रशासनाने शहरातील जलस्रोत, पाणीगळती, पाण्याची नासाडी, नवीन जलस्रोत आणि पाणी बचत यांचा विचार करून कृती आराखडा तयार करावा. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.

You cannot copy content of this page