कुंभारमाठ कातकरी वस्तीवर ‘घुंगुरकाठी’ व ‘उर्जा’मार्फत जीवनावश्यक साहित्याचे वाटप

*कमांडर राजीव कुबल आणि मंगेश सामंत यांचा पुढाकार : ३५ हजारांचे साहित्य वाटले

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील माळावर राहणाऱ्या आदिवासी कातकरी वस्तीवर आज सकाळपासुनच लगबग होती. या समाजातील १४ कुटुंबांना आज ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ‘उर्जा मुव्हमेंट’ यांच्यावतीने ३५ हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आणि तौक्ते वादळाचा फटका बसुन होते नव्हते ते सर्व गमावलेल्या कातकरी बांधवांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली. यासंदर्भात माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मालवण पॉलिटेक्निकच्या समोर असलेल्या कुंभारमाठ माळरानावर ४०ते ५० वर्षांपासुन आदिवासी कातकरी समाजबांधवांची वस्ती आहे. येथे १४ कुटुंबाच्या झोपड्या असुन ही सर्व मंडळी मोलमजुरी करणारी व हातावर पोट असणारी आहेत. तौक्ते वादळाचा फटका बसून यापैकी काही झोपड्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली. या वस्तीला भेट दिल्यावर सर्वच झोपड्यांमध्ये पाणी गेल्याने धान्य व अन्य साहित्याचे नुकसान झाल्याचे दिसुन आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर व प्रसाद जळवी उपस्थित होते. वादळाला दोन आठवडे उलटून गेल्यावरही या वस्तीवरील रहिवाशांना कोणतीही मदत मिळालेली नाही, असे लक्षात आल्यावर मुंबईतील ‘उर्जा मुव्हमेंट’चे निवृत्त नौदल अधिेकारी कमांडर राजीव कुबल आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश सामंत यांना त्याची कल्पना दिली. मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे माजी विद्यार्थी असलले श्री. कुबल व श्री. सामंत यांनी या कुटुंबाना मदत करण्याबाबत अनुकुलता दाखवली. त्यानुसार ‘घुंगुरकाठी’च्या माध्यमातून आज या १४ कातकरी कुटुंबांना प्रत्येकी रु. २५०० किंमतीच्या एकुण ३५ हजार रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रत्येक किटमध्ये २५ किलो तांदुळ, कडधान्ये, मसाले, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, कांदेबटाटे, साबण, बिस्कीटे अशा प्रकारच्या वस्तुंचा समावेश होता. वस्तीवर झालेल्या एका छोट्याशा कार्यक्रमात या साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीबद्दल रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर, प्रसाद जळवी यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाला मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते हरी केळुसकर, संतोष लुडबे, दिशा जमदाडे उपस्थित होते. *कुबल यांचा ‘झुम’द्वारे संवाद* कमांडर राजीव कुबल व मंगेश सामंत यांनी यावेळी मुंबई येथून ऑनलाईन झुम मिटिंगद्वारे कातकरी बांधवांशी संवाद साधला. कोविडच्या निर्बंधांमुळे आपल्याला इच्छा असुनही या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. मात्र यापुढेही ‘घुंगुरकाठी’ व ‘उर्जा’मार्फत मदतकार्य व अन्य सामाजिक उपक्रम सुरु ठेवण्याचा मनोदय श्री. कुबल यांनी व्यक्त केला. यामध्ये श्री. कुबल यांचे टोपीवाला हायस्कुलमधील सहाध्यायी सर्वश्री नंदकिशोर महाजन, दिनेश साळसकर, सुरेश मयेकर सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page