ग्रामपंचायत सनियंत्रण समितीच्या संयुक्त बैठकीत निर्णय*
मालवण (प्रतिनिधी) कट्टा बाजारपेठेत तसेच पंचक्रोशीतील अन्य गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वरची गुरामवाडी ग्रामपंचायत सनियंत्रण समितीने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या संयुक्त सभेत कट्टा पोलीस दूरक्षेत्र, व्यापारी संघटना, ग्रामस्थांसोबत चर्चा करून सर्वानुमते गाव हिताच्यादृष्टीने निर्णय घेण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दशक्रोशीतील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेली कट्टा बाजारपेठ शनिवार ५ ते १२ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मालवण- कसाल या हमरस्त्यावर मध्यवर्ती भागात कट्टा बाजारपेठ वसलेली असल्याने दोन्ही बाजूंनी ये- जा करणाऱ्या लोकांची सतत वर्दळ असते. कट्टा बाजारपेठेत गोळवण, कुमामे, कुणकवळे, नांदोस, वराड, तळगाव, पेंडुर-खरारे, काळसे या गावातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लोक येतात. त्यामुळे लोकांच्या एकमेकांच्या संपर्कामुळे कोरोनाचा फैलाव वाढतो. यासाठी ५ जूनपासून पुढील आठ दिवस बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय संयुक्त सभेत सर्वानुमते घेण्यात आला. सतर्कता म्हणून गावासह बाजारपेठेत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी आरोग्य विभागांच्या मदतीने ग्रामपंचायतीमार्फत केली जाणार असून प्राथमिक तपासणीत संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल, असेही ठरविण्यात आले. ज्यांना स्वतःहून कोरोना टेस्ट करायची असल्यास त्यांनी ग्रा. पं. शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या आठ दिवसांत अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त औषध दुकाने पूर्ण वेळ सुरू राहतील. सकाळी ७ ते ९ या वेळेतच दूध व पेपर विक्री नियमांचे पालन करून केली जाईल. इतर सर्व दुकाने भाजीपाला, मासे, मटण इत्यादी सर्व कडक बंद ठेवण्यात आले आहे. तसेच बाजारपेठेत विनाकारण फिरणे, मास्क न लावता फिरणे महागात पडणार असून कामाव्यतिरिक्त विनाकारण बाजारपेठेत फिरल्यास व शासनाच्या नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई अथवा आरोग्य रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. जे छोटे-मोठे व्यापारी आहेत. त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल व जे व्यापारी दंड भरणार नाहीत, त्यांच्यावर पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करावे व कारवाईपासून वाचावे, असेही आवाहन ग्रामपंचायत, सनियंत्रण समिती, पोलीस प्रशासनाने केले आहे.
