Headlines

‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’चा संदेश देत मालवणात पोषण रॅली

.

मालवण दि प्रतिनिधी : बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (ICDS मालवण) आणि पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर पर्यत या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ अंतर्गत पंचायत समिती परिसरात विविध नावीन्यपूर्ण जनजागृती उपक्रम, पोषण प्रतिज्ञा तसेच भव्य पोषण रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ हे मुख्य ब्रीदवाक्य समोर ठेवून तळागाळातील प्रत्येक नागरिकाचा पोषण मोहिमेत सहभाग आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमास पंचायत समिती मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत-हजारे, पस सदस्य मानसी भोगावकर, योजना कांबळी, सीमा परुळेकर, माधुरी मसुरकर, रिया बावकर, दिपक चव्हाण, गणेश तोंडवळकर, दिपक सुर्वे, संजय ठाकूर, संतोष गावडे यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अंगणवाडी सेविकांनी सादर केलेले ‘जंक फूडच्या कुपोषण राक्षसा’वर पोषण मातेची सुपोषणाची छत्री हे अभिनव सादरीकरण. सध्याच्या काळात मुलांमध्ये वाढत असलेल्या जंक फूडच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि कुपोषणाचा धोका याचे प्रभावी चित्रण करण्यात आले. या संकल्पनेत जंक फूडमुळे निर्माण होणाऱ्या कुपोषणाच्या समस्येचे ‘राक्षसा’च्या माध्यमातून प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले. या राक्षसापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविकेने ‘पोषण माता’ची भूमिका साकारत ‘सुपोषणाची छत्री’ धरली. योग्य आणि संतुलित आहाराच्या माध्यमातून बालकांना कुपोषणापासून दूर ठेवता येते, असा प्रभावी संदेश या सादरीकरणातून देण्यात आला. या कल्पक उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केला

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत यांनी ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या पोषण माहच्या विविध उपक्रमांची सविस्तर कार्यरूपरेषा मांडली.

You cannot copy content of this page