डॉ. ज्योती तोरसकर यांच्या संशोधनाची राष्ट्रीय परिसंवादात दखल
मालवण : (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या समुद्रात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करण्यापूर्वी ज्या ठिकाणी किल्ल्याची पायाभरणी केली असे मालवण दांडी- वायरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या शीलास्थळाविषयी मालवण मधील इतिहास संशोधक डॉ. ज्योती बुवा- तोरसकर यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिसंवादात संशोधनपर लेखाचे सादरीकरण केले. यामुळे सिंधुदुर्गाच्या सागरी इतिहासातील आजवर व्यापक चर्चेपासून काहीसे दूर राहिलेले, मात्र ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘मोरयाचा धोंडा’ हे शिलास्थळ प्रथमच व्यापक राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. दक्षिण कोकणातून या राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात सहभागी झालेल्या डॉ. ज्योती तोरसकर या एकमेव महिला संशोधक होत्या.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष निमंत्रणाने डॉ. ज्योती तोरसकर यांना दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठावर संशोधन सादर करण्याची संधी मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या निर्मितीपूर्वी मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या ‘मोरयाचा धोंडा’ या स्थळी केलेले गणेशपूजन व सागरपूजन, तसेच या शिलास्थळावरील विविध शिलाचिन्हे, त्यांचे धार्मिक-सांस्कृतिक संदर्भ आणि सिंधुदुर्गाच्या सागरी राज्यनिर्मितीशी असलेले संबंध यांचा अभ्यास डॉ. तोरसकर यांनी आपल्या संशोधनातून मांडला. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे स्थळ आणि त्यावरील शिलाचिन्हे आजवर व्यापक ऐतिहासिक चर्चेपासून दूर राहिली होती. ‘मोरयाचा धोंडा’ येथे आढळणारी चंद्र, सूर्य, गणेश, शिवलिंग, नंदी आणि पादुका यांसारखी शिलाचिन्हे तसेच सिंधुदुर्गासह सागरी किल्ल्यांच्या निर्मितीपूर्वी झालेल्या धार्मिक-सांस्कृतिक विधींचा संदर्भ डॉ. तोरसकर यांनी ऐतिहासिक दस्तऐवज, स्थानिक परंपरा आणि स्थलसाक्ष यांच्या आधारे आपल्या संशोधनपर लेखातून मांडला. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या इतिहासाकडे केवळ लष्करी किंवा स्थापत्याच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक आणि सागरी राज्यनिर्मितीच्या व्यापक संदर्भातून पाहण्याची नवी दिशा या संशोधनातून समोर आली, असे डॉ. तोरसकर यांनी सांगितले.
किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पाठपुराव्याची दखल
‘मोरयाचा धोंडा’ या ऐतिहासिक स्थळाच्या जतन, संवर्धन आणि शासकीय स्तरावरील नोंदींसाठी किल्ले प्रेरणोत्सव समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचीदेखील या परिसंवादात दखल घेण्यात आली. समितीच्या प्रयत्नांमुळे या ऐतिहासिक स्थळाचा सातबारा उतारा उपलब्ध होणे, शासकीय अभिलेखांमध्ये त्याची नोंद होणे तसेच या स्थळाला शासकीय पूजेचा मान मिळणे, या बाबी विशेष उल्लेखनीय ठरल्या आहेत. या शासकीय मान्यता आणि ऐतिहासिक स्थळाच्या दस्तऐवजीकरणासाठी झालेल्या प्रयत्नांबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
देशभरातील अभ्यासकांकडून कौतुक
जेएनयूमधील या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाला तंजावरचे बाबाराजे भोसले, रघुजी आंग्रे, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित, तसेच देशातील विविध विद्यापीठांतील मान्यवर प्राध्यापक, संशोधक आणि इतिहास अभ्यासक उपस्थित होते. विविध राज्यांतून आलेल्या तज्ज्ञांसमोर ‘मोरयाचा धोंडा’ या विषयाचे सादरीकरण झाल्याने या ऐतिहासिक स्थळाची माहिती देशाच्या विविध भागांतील अभ्यासकांपर्यंत पोहोचली. या चर्चासत्राचे अध्यक्ष जेएनयूचे प्राध्यापक नवेंदु शेखर यांनी डॉ. तोरसकर यांच्या सादरीकरणाचे तसेच त्यातील संदर्भ साहित्याचे विशेष कौतुक केले. सादरीकरणानंतर अनेक मान्यवरांनी ‘मोरयाचा धोंडा’ प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली. संशोधनपर लेख, सादरीकरणाची मांडणी आणि त्यातून समोर आलेले शिलास्थळाचे ऐतिहासिक महत्त्व यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
सिंधुदुर्गाच्या सागरी इतिहासावर दीर्घकाळ संशोधन करणाऱ्या डॉ. ज्योती तोरसकर यांच्या या संशोधनामुळे मालवणच्या समुद्रकिनारी असलेला ‘मोरयाचा धोंडा’ हा केवळ स्थानिक श्रद्धेचा विषय न राहता राष्ट्रीय ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय चर्चेचा विषय बनण्याची दिशा निर्माण झाली आहे. देशभरातील तज्ज्ञांसमोर या स्थळाची माहिती पोहोचणे ही सिंधुदुर्गाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.
या संशोधनपर लेखाच्या अभ्यासपूर्ण स्लाईड तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.
स्थानिक इतिहासातील दुर्लक्षित शिलास्थळाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देत ‘मोरयाचा धोंडा’ राष्ट्रीय इतिहासाच्या आणि सांस्कृतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संशोधनातून झाले आहे. या निमित्ताने या स्थळाच्या पुढील ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी नवी दारे खुली झाली असून, सिंधुदुर्गाच्या सागरी वारशाच्या अभ्यासाला राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
