मालवण (प्रतिनिधी)
मालवणच्या प्राप्ती प्रसाद सावंत हिने नेदरलँडूमधील ट्वेंटे विद्यापीठात (University of Twente) भू-माहिती विज्ञान आणि पृथ्वी निरीक्षण या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात ९.६ गुण मिळवित विक्रमी यश संपादन केले आहे. पृथ्वी विज्ञानासाठी उपयोजित दूरसंवेदन या विशेष विषयात तिने विद्यापीठात सर्वोच्च स्थान मिळविले. या यशानंतर प्राप्तीला नासा तसेच अन्य अंतराळ संशोधन संस्थांकडून थेट नोकरीची ऑफर मिळाल्या आहेत.
प्राप्ती सावंत हिने नुकताच दोन वर्षांचा हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. विद्यापीठातील आतापर्यंतचा ९.२ गुणांचा विक्रम मोडत तिने ९.६ गुण मिळविले. तिने ‘झुइडवाल गुरुत्वीय-चुंबकीय विसंगतीचे द्विमितीय प्रतिमान प्रक्रियेद्वारे मूल्यमापन’ विषयावर प्रबंध सादर केला.
प्राप्ती ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणची असून कुणकवळे हे तिचे मूळ गाव आहे. मालवण येथील रोझरी इंग्रजी माध्यम शाळेत चौथीपर्यंत तिचे शिक्षण झाले. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठात तिने पुढील शिक्षण घेतले. अकरावी, बारावीचे शिक्षण पुण्यातील जाधवार महाविद्यालयात झाले.
प्राप्तीची आई कॅनडातील टोरोंटो विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी तेथेच पीएचडी केली आहे. भविष्यात अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पीएचडी करण्याची तिची इच्छा आहे. लहानपणापासूनच तिला अंतराळाशी संबंधित विषयांमध्ये रस असल्याची माहिती वडील प्रसाद सावंत यांनी दिली.
