Headlines

गणेशोत्सवानिमित्त वैभववाडीत चार ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात…

⚡वैभववाडी ता.१०-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे येथून तालुक्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी वैभववाडी तालुक्यात चार ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. करुळ पोलीस तपासणी चेक नाका येथेही वैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले असून, येणाऱ्या प्रवाशांची आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी करुळ पोलीस तपासणी चेक नाका येथे भेट देऊन वैद्यकीय पथकाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चाकरमान्यांना आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली.
यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सौ. साची कोलते, सरपंच नरेंद्र कोलते, माजी उपसरपंच सचिन कोलते, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, आरोग्यसेविका धनश्री देसाई, आरोग्य सेवक श्री. खाडे, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत सावंत, राहुल कनाके आदी उपस्थित होते.
वैभववाडी तालुक्यातील रेल्वे स्टेशन, भुईबावडा चेक नाका, करुळ पोलीस तपासणी चेक नाका तसेच वैभववाडी बसस्थानक या चार ठिकाणी वैद्यकीय पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी तालुक्यात दाखल होत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page