Headlines

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची शालेय डॉजबॉल स्पर्धेत विभागस्तरासाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या तीन संघांनी जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत सातत्यपूर्ण सराव, उत्कृष्ट सांघिक खेळ आणि जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शालेय डॉजबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत तिहेरी यश संपादन केले. तसेच हे तिन्ही संघ विभागस्तरावर होणाऱ्या डॉजबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
तीनही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या कौशल्याची व सांघिक भावनेची प्रभावी झलक दाखवली. या उल्लेखनीय यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि क्रीडा शिक्षक श्री. भूषण परब यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. या शानदार कामगिरीमुळे मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या घवघवीत यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सह-संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर, क्रीडा शिक्षक श्री. भूषण परब तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page