स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई:कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले..

कुडाळ : अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित विलास संभाजी वसेकर (वय ३५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले. ही कारवाई २६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विलास वसेकर हा स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत असल्याने त्याचा शोध सुरू होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याचा सातत्याने शोध घेतला. दरम्यान, तो पुण्यातील मोशी येथील कचरा डेपो परिसरात अँथनी लारा रिन्यूएबल एनर्जी या कंपनीत काम करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. तसेच त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला असता तो मोशी, पुणे येथे आढळून आला. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले.
गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर २७ ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
वसेकरविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास वसेकर याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीणमधील बार्शी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-ब, ३५४-अ यांसारख्या कलमांनुसार एकूण तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, सदानंद राणे, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि प्रथमेश कदम (मोपवि) यांचा समावेश होता.
