मालवण, दि प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत मालवण नगरपरिषदेच्या वतीने यंदा ‘पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाचा संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून घराघरात पोहोचविणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
ही स्पर्धा मालवण नगरपरिषद हद्दीतील घरगुती गणेश सजावट गटासाठी आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेश सजावट करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
स्पर्धेत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, प्लास्टिक व थर्माकोलमुक्त सजावट, कल्पकता व नाविन्य, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, माझी वसुंधरा अभियानाचा संदेश, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, जल-ऊर्जा व वृक्षसंवर्धन तसेच परिसर स्वच्छता या बाबींवर एकूण १०० गुणांच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकास ७ हजार ५०० रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास २ हजार ५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट पर्यावरणपूरक सजावट, उत्कृष्ट पुनर्वापर सजावट, उत्कृष्ट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन संदेश आणि उत्कृष्ट कलात्मक सजावट अशा विशेष पुरस्कारांचाही समावेश आहे.
या उपक्रमासाठी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ असून अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेच्या प्रवेश अर्जासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार इच्छुक नागरिकांनी मालवण नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
