Headlines

“नगरपालिका कारभाराची निष्पक्ष चौकशी करा…

समीर वंजारी: संजू परबांच्या पत्रकार परिषदेला दीपक केसरकरांची सहमती होती का..? तर पुरावे आणि नावे जाहीर करण्याचे आश्वासन संजू परबांच कुठे गेले..?

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या विशेष सभेनंतर उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्दे ज्या पद्धतीने मांडले, त्यातून नगरपालिकेच्या कारभारातील प्रश्नांचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे. विशेष सभेतील प्रमुख व्यक्तींची अनुपस्थिती आणि नगरपालिकेच्या कामकाजाबाबत सत्ताधारी गटातीलच लोकप्रतिनिधींकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न पाहता, नगरपालिकेच्या प्रशासनावर तसेच नगराध्यक्षांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची टीका काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. समीर वंजारी यांनी केली.

जनतेकडून कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशांचा योग्य व पारदर्शक विनियोग होणे आवश्यक आहे. मात्र, नगरपालिकेच्या कामकाजाबाबत सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीच असमाधान व्यक्त करत असतील, तर प्रशासनात सर्व काही सुरळीत असल्याचा दावा कसा करता येईल, असा सवाल वंजारी यांनी उपस्थित केला. विशेष सभेत ज्या व्यक्तींची उपस्थिती तसेच ऑडिटसंदर्भातील स्पष्टीकरण महत्त्वाचे होते, त्यांची अनुपस्थिती ही गंभीर बाब आहे. संबंधित व्यक्ती सभेला का उपस्थित राहिल्या नाहीत, याचे स्पष्टीकरण जनतेला मिळणे आवश्यक आहे. प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत चर्चा झाली असती, तर विशेष सभेचा उद्देश अधिक परिणामकारकपणे साध्य झाला असता, असेही त्यांनी म्हटले.

नगरपालिकेतील कामकाजाबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडूनच गंभीर प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपस्थित प्रश्नांचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत वादग्रस्त कामकाजाबाबत घाईने निर्णय घेऊ नयेत. अन्यथा पारदर्शकतेपेक्षा अन्य बाबींना प्राधान्य दिले जात असल्याचा संशय निर्माण होऊ शकतो, असा इशाराही अॅड. वंजारी यांनी दिला.

‘पुरावे आणि नावे जाहीर करण्याचे आश्वासन कुठे गेले?’

नगरपालिकेच्या या प्रकरणावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, त्यांच्या आजच्या भूमिकेवरून आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना समोपचाराची भूमिका घेण्यास सांगितले आहे का, असा प्रश्नही अॅड. वंजारी यांनी उपस्थित केला. यापूर्वीच्या पत्रकार परिषदांमध्ये या प्रकरणासंदर्भात आपल्याकडे अनेक पुरावे असून संबंधित व्यक्तींची नावे लवकरच जनतेसमोर आणू, असे परब यांनी सांगितले होते. आता ते पुरावे आणि संबंधित व्यक्तींची नावे कुठे आहेत, असा सवाल करत त्यांनी कोणाचीही भीड न बाळगता आपल्याकडील माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी वंजारी यांनी केली.

जनतेने मतदानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींवर जो विश्वास व्यक्त केला आहे, त्या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी जनतेच्या पैशांशी आणि नगरपालिकेच्या कारभाराशी संबंधित प्रश्नांवर स्पष्ट व पारदर्शक भूमिका मांडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी, नगरविकास खात्याकडे चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणाकडे काँग्रेस पक्ष गांभीर्याने पाहत असून, लवकरच जिल्हाधिकारी तसेच नगरविकास खात्याकडे सविस्तर निवेदन साद करण्यात येणार आहे.

नगरपालिकेतील संबंधित प्रकरणांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे अॅड. समीर वंजारी यांनी स्पष्ट केले. जनतेच्या पैशांचा विनियोग पारदर्शकपणे झाला पाहिजे. तसेच नगरपालिकेच्या कारभाराशी संबंधित जबाबदार व्यक्तींनी जनतेसमोर उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका असल्याचे अॅड. वंजारी यांनी सांगितले.”

You cannot copy content of this page