Headlines

दिवाळीपूर्वी कुडाळ-बाव रेल्वेस्टेशन मार्गावरील खड्डे बुजवा; अन्यथा रस्ता रोको…

ठाकरेसेनेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा:अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

⚡कुडाळ ता.२७-: रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या बाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यापूर्वी अगदी मे महिन्याच्या अखेरी पर्यंत या रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरु होते. नंतर त्या रस्त्याचं अद्यापपर्यंत डांबरीकरण झालं नसल्यामुळे या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक, पादचारी, या मार्गावरून जाणारे रेल्वे प्रवाशी, पर्यटक याना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि रस्ता सुरळीत करावा या मागणीसाठी आज कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे बुजवले नाही तर ठाकरेसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कुडाळ शहराला रेल्वे स्टेशनशी जोडणारा बाव रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. यावर्षी मे महिन्यात या रस्त्याची उंची वाढविण्यात आली. पण त्यानंतर पाऊस सुरु झाला, रस्त्याचे डांबरीकरण होऊ शकले नाही. परिणामी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले. कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्हयातील गजबजलेलं रेल्वेस्टेशन आहे. त्यामुळे रोज हजारो रेल्वे प्रवाशी, वाहनधारक, रिक्षाचालक, पर्यटक या रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडल्याने आणि धुळीचे साम्राज्य असल्याने येथून प्रवास करणाऱ्याना त्रास सहन करावा लागतो. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला धडक देत जाब विचारला.
यावेळी उबाठाचे तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शहर प्रमुख संतोष शिरसाट, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, ठाकरे सेना शहर प्रवक्ते बाळा पावसकर, अमित राणे, गुरु गडकर, संदीप महाडेश्वर, गोट्या चव्हाण, बाळा वेंगुर्लेकर, सुशील चिंदरकर, संजय बोभाटे, शैलेश जळवी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ उपस्थित नसल्याने कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांना ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका वृद्धेचा मृत्यू झाला होता हि बाब तालुका प्रमुख राजन नाईक यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिली. रस्त्यावर पडलेले खड्डे कधी बुजवणार कि अजून कोणी मृत्यूमुखी पडण्याची किंवा जखमी व्हायची वाट बघताय का, असा परखड सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेळकाढू धोरणावर सर्वच उबाठा पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. राजन नाईक, मंदार शिरसाट, संजय बोभाटे, बाळा पावसकर, गुरु गडकर यांनी चर्चेत भाग घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दरम्यान सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांचे कार्यालयात आगमन झाल्यावर ठाकरेसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला मोर्च्या त्यांच्या दालनाच्या दिशेने वळविला. त्यांच्या कानावर आपले म्हणणे घातले. आणि येत्या दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले नाही तर रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उबाठा पदाधिकाऱ्यांनी श्री. पिसाळ यांच्याकडे सुपूर्द केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार या रस्त्याच्या भरावाचे काम नवीनच आहे. भराव पूर्ण खाली बसला कि डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धोरणानुसार १५ नोव्हेंबर नंतर डांबरीकरणाचे काम केले जाते. त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी खडे बुजवून १५ नोव्हेंबर नंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page