उपाध्यक्ष साईल, सभापती राऊळ यांच्यासह सदस्य आक्रमक; प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी..
ओरोस ता १०
पवित्र पोर्टल द्वारे प्राथमिक शिक्षक भरती प्रकिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती देताना गालबोट लागले आहे. गुरुवारी राबविलेली नियुक्ती प्रक्रियेला व्हिडिओ शूटिंग केली गेलेली नसून निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच ही प्रक्रिया संपविली गेली. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सदस्य रुपेश कानडे, केशव नारकर यांनी ही प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली. यामुळे अध्यक्ष आणि प्रशासन विरुद्ध अन्य पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य असे वातावरण निर्माण झाले आहे.
पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यातील २८२ प्राथमिक शिक्षकांची भरती जाहीर झाली होती. यामध्ये जिल्ह्याला १८८ उमेदवारांनी पसंती दिली होती. या सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. यावेळी १६० शिक्षक हजर राहिले होते. यातील पाच उमेदवार टीईटी घोटाळ्यातील असल्याने त्यांना वगळता उर्वरित १५५ शिक्षकांना गुरुवारी समुपदेशनाचे नियुक्ती देण्यासाठी बोलाविण्यात आले होते. सकाळी १० वाजता ही जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रक्रिया सुरू झाली. मात्र, प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा आरोप करीत उपाध्यक्ष तुकाराम साईल आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सभागृह सोडत नियुक्ती प्रक्रियेतून काढता पाय घेतला.
दुपारी २ वाजेपर्यंत ही प्रक्रिया संपली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने आदी उपस्थित होते. दरम्यान, समुपदेशन प्रक्रिया राबविण्यासाठी स्लॉट पाडण्यात आले होते. त्यामध्ये नाशिक आणि संभाजीनगर येथील दोन उमेदवारांना दुपारी साडेतीन वाजण्याचा स्लॉट देण्यात आला होता. ते दुपारी सव्वा तीन वाजता आले असता प्रक्रिया संपली होती. ही बाब जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सदस्य रुपेश कानडे, केशव नारकर यांना समजताच त्यांनी प्रक्रियेच्या ठिकाणी धाव घेऊन प्रशासनाला धारेवर धरले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्यामुळे जिल्हा परिषदेत वातावरण तापले होते. दिलेल्या वेळेपूर्वी प्रक्रिया पूर्ण कशी केलात ? असा प्रश्न या पदाधिकारी सदस्यांनी करीत प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग करण्याची ऑर्डर दाखवा, अशी मागणी केली. यावेळी प्रशासन उघडे पडले. अधिकृत ऑर्डर नसल्याने सामान्य प्रशासन आणि शिक्षण विभाग एकमेकांकडे बोट दाखवू लागले. त्यामुळे पदाधिकारी, सदस्य यांनी अधिक आक्रमक होत ही प्रक्रिया पुन्हा राबविण्याची आग्रही मागणी केली. तसेच जे दोन उमेदवार हजर झाले त्यांची पंचयादी घालण्याची मागणी केली. उपाध्यक्ष साईल यांनी थेट सामान्य प्रशासन विभागात जात व्हिडिओ शूटिंग करण्याची ऑर्डर मागितली. यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत आले होते.
