Headlines

स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला उजाळा; मालवणात वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद…

⚡मालवण ता.२७-:
स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकलेचा विकास व्हावा, या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ च्या औचित्याने सेवांगणच्या ना. ग. गोरे सभागृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ‘मला आवडलेले स्वातंत्र्यसैनिक’ या स्पर्धेच्या विषयावर वक्तृत्व सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वैष्णवी आचरेकर आणि रुचिता चिंदरकर यांनी साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेचे सादरीकरण केले. त्यानंतर मान्यवरांनी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. प्रा. वासंती किणीकर लिखित ‘क्रांतिज्योती’ या पुस्तकाच्या आधारे स्पर्धेचा विषय निश्चित करण्यात आला होता. या पुस्तकाच्या माध्यमातून मालवण परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षक दीपक भोगटे यांनी लेखिका वासंती किणीकर यांच्या लेखनपरिश्रमांचा गौरव केला.

या स्पर्धेत रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल, अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, कन्याशाळा मालवण, ओझर विद्यामंदिर कांदळगाव आणि दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शामराव कोचरेकर, हुतात्मा दत्ताराम कोयंडे, बबन डिसोझा, मारुतीराव शिरसेकर, हुतात्मा प्रभाकर रेगे, केशव घुर्ये, वसंत व्यंकोजी सामंत, दादासाहेब शिखरे, कृष्णाजी कान्होजी लुडबे आणि रामराव पांगे या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली.

स्पर्धेचे परीक्षण किशोर शिरोडकर आणि दीपक भोगटे यांनी केले. या वेळी सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर, कार्यकारिणी सदस्य दीपक भोगटे, व्यवस्थापक संजय आचरेकर, गौरी केळुसकर, प्रदीप सामंत, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साने गुरुजी वाचन मंदिराच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात साहित्यिकांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page