राजेंद्र केसरकर:‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची वेंगुर्ल्यात विशेष बैठक..

⚡मालवण ता.२७-:
‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना गावातून तालुक्याकडे, तालुक्यातून जिल्ह्याकडे आणि जिल्ह्यातून थेट राष्ट्रापर्यंत जोडली जाणार आहे. गावातील गरजू व्यक्ती आणि तरुणांना उद्योजकतेची संधी देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी स्वतःच्या व्यवसायातून प्रगती साधावी, यासाठी मसिआ सुरुवातीपासून व्यवसाय उभारणीच्या विविध टप्प्यांपर्यंत सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मसिआचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजेंद्र केसरकर यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA-मसिआ) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘गाव तिथे उद्योजक’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची विशेष बैठक सोमवारी वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली. वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून ठेवण्यात आले आहे. या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला मसिआचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजेंद्र केसरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल वालावलकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य कुणाल वरसकर आणि कार्यालयीन समन्वयक आग्नेल फर्नांडिस, तसेच वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र केसरकर यांनी गाव तिथे उद्योजक संकल्पनेद्वारे गावपातळीवर उद्योजक घडविताना गाव, तालुका, जिल्हा आणि राष्ट्र यांना जोडणारी व्यवसायाची साखळी निर्माण करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले. मसिआचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य कुणाल वरसकर यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर या संघटनेची ओळख करून देत ‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेचे महत्त्व विशद केले. वरसकर म्हणाले, “वेंगुर्ला तालुक्याची आर्थिक प्रगती आणि समृद्धी वाढविण्यासाठी ही संकल्पना मैलाचा दगड ठरू शकते. व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी मसिआकडे यावे. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. याच उद्देशाने कुडाळ एमआयडीसी परिसरात विशेष प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना मसिआचे उपाध्यक्ष तथा माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, “प्रत्येक ग्रामपंचायतीचे कामकाज आणि त्या परिसरातील व्यवसायाची क्षमता यांची आम्हाला चांगली जाण आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा आणि व्यवसायाच्या संधींचा योग्य शोध घेऊन तरुणांना दिशा दिल्यास उद्योजकनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया.”
सरपंच आणि प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
वेंगुर्ला पंचायत समितीच्या पुढाकारातून तालुक्यातील सर्व गावांच्या सरपंचांना एकत्र आणून या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मसिआच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या संकल्पनेला उपस्थित सरपंच आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी मसिआच्या मोहिमेला सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
पंचायत समिती प्रशासन, ग्रामपंचायती आणि मसिआ यांच्यात समन्वय साधून हा उपक्रम प्रभावीपणे राबविल्यास वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण उद्योगांना नवी दिशा मिळू शकते. स्थानिक साधनसंपत्तीचा उपयोग, तरुणांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन आणि नव्या उद्योगांची उभारणी यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
