Headlines

वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धनास चालना देण्याच्या उद्देशाने “पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६” आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा फक्त वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी मर्यादित असून, पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या कल्पक व नाविन्यपूर्ण सजावटीस विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सजावटीसाठी केवळ पर्यावरणपूरक व इको-फ्रेंडली साहित्याचा वापर करून करण्यात यावी. तसेच गणेशमूर्ती शाडू माती, शेतमाती अथवा अन्य नैसर्गिक मातीपासून निर्मित असणे आवश्यक आहे. पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या साहित्याचा वापर टाळण्याच्या दृष्टीने सजावटीमध्ये थर्माकोल व एकेरी वापराच्या प्लास्टिकचा (Single Use Plastic) वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर शक्यतो पूर्णतः टाळावा.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार असून, प्रथम क्रमांकासाठी ५००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २००० रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेची नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ असून, १७ सप्टेंबर २०२६ रोजी स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी नागरिकांनी वेंगुर्ला नगररपरिषदशी संपर्क साधावा. स्पर्धकांनी आपल्या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अधिकृत फेसबुक पेजला टॅग करावेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page