कौले काढून अज्ञात चोरट्याचा घरात प्रवेश; सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू..
⚡सावंतवाडी,ता.०८-: ओवळीये-वरचीवाडी येथे बंद घराच्या कौले काढून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवळीये-वरचीवाडी येथील कौस्तुभ विष्णू सावंत (वय ३३) यांच्या बंद घरात सकाळी ५.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली. अज्ञात इसमाने घराची कौले काढून आत प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेल्या चावीच्या साहाय्याने कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरट्याने १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४१.५८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची बाली, असे एकूण २ लाख ५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक व्हॅनही घटनास्थळी पाचारण करण्यात आली.
परि. डीवायएसपी श्री. शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गलोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.
