सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष:वेताळबांबर्डे तिठा ते पावणाई टेंब मार्ग धोकादायक..

⚡कुडाळ ता.२८-: तालुक्यातील वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक–नारूर या मुख्य मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे १५ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील खचलेल्या साईडपट्ट्या आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारांची सुविधा नसल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
वेताळ बांबर्डे तिठा ते पावणाई टेंब हा मार्गावरील भाग विशेषतः धोकादायक बनला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डे आणि अरुंद झालेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये काँक्रीट ग्रिट टाकून तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, अवघ्या आठ दिवसांत पुन्हा खड्डे पडल्याने रस्त्याची परिस्थिती पूर्ववत झाली. परिणामी, गणेशोत्सवाच्या काळातही नागरिकांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागला. सध्या देखील या मार्गाची दुरवस्था कायम असून, कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी होत आहे.
गटारांअभावी रस्त्याची दुरवस्था
वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक–नारूर या सुमारे १५ किलोमीटरच्या मार्गावर पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण खराब होऊन ठिकठिकाणी मोठे खड्डे पडत आहेत. पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था केल्याशिवाय रस्त्याची दुरवस्था थांबणे कठीण असल्याचे चित्र आहे.
शेकडो वाहनचालकांना रोजचा त्रास
या मार्गावरून एसटी बस, ट्रक, कार आणि दुचाकींसह शेकडो वाहनांची दररोज ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडपट्ट्या खचल्यामुळे समोरून मोठे वाहन आल्यास दोन्ही वाहनांना एकाच वेळी सुरक्षितपणे मार्ग काढणे कठीण होते. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर बनते.
पावणाई टेंब–आईनमळा मार्गाचीही दुरवस्था
वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब ते आईनमळा हा तीन ते चार किलोमीटरचा मार्गही खड्डेमय झाला आहे. या रस्त्याच्या साईडपट्ट्याही खचल्या असून, वाहतुकीसाठी मार्ग अडचणीचा ठरत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीकडेही प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक–नारूर तसेच पावणाई टेंब ते आईनमळा या दोन्ही मार्गांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, साईडपट्ट्यांची दुरुस्ती करणे आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
