कणकवली : तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेने केला आहे. करूळ ग्रामपंचायतीतील अनधिकृत पाण्याची टाकी हटविण्याबाबत कार्यवाही न होणे, ओसरगाव ग्रामपंचायतीतील दोन सदस्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न आणि सभांच्या इतिवृत्ताबाबतच्या तक्रारींवरून ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख राजू राठोड यांनी दिला.

करूळ ग्रामपंचायतीमधील अनधिकृत पाण्याची टाकी हटविण्याबाबत अद्याप कार्यवाही झाली नसल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने उपस्थित केला. तसेच ओसरगाव ग्रामपंचायतीतील दोन सदस्य गेल्या नऊ महिन्यांपासून मासिक सभांना अनुपस्थित असतानाही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नसल्याची तक्रार करण्यात आली. काही ग्रामपंचायतींमध्ये मासिक सभेपूर्वी मागील सभांचे इतिवृत्त उपलब्ध करून देण्याची मागणी सदस्यांकडून केली जाते. मात्र, ग्रामसेवकांकडून त्याबाबत कार्यवाही होत नसल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
ग्रामपंचायतींमधील कथित अनियमितता आणि बेकायदेशीर कामांबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित ग्रामसेवकांना आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तक्रारींची दखल न घेतल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडून संबंधितांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राजू राठोड यांनी दिली.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख विलास घोडेकर, बबली राणी, रवींद्र खंदारे, सिद्धेश राणे, ओमप्रकाश ताम्हाणेकर, बाळा राऊत, तात्या निकम आणि गुरू पेडणेकर आदी उपस्थित होते.
