मालवण (प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरण, गणेशोत्सव मंडळे, रिक्षा संघटना तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रतिनिधींना विविध सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. नाट्यगृह आवार, बांगीवाडा येथे सहा सीटर वाहनांसाठी व्यवस्था करण्यात येणार असून, सारस्वत बँक परिसरात मोटारसायकली एका बाजूने लावण्याची सूचना करण्यात आली आहे. बाजारपेठ येथील राणे मेडिकल येथून सर्व वाहनांच्या वाहतुकीवर बंदी राहणार आहे. बॉम्बे टेक्सटाईल येथे सायकलींसाठी प्रवेश ठेवण्यात येणार असून नेरुरकर गल्ली सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.
बाजारपेठ रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंग बंद करण्यात आले आहे. नो-पार्किंग क्षेत्रात वाहन उभे करून गेल्यास संबंधित वाहनधारकावर पोलिस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच देऊळवाडा नाका येथून अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. शहरातील प्रमुख नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दरम्यान, भंडारी हायस्कूल ते भाजी मार्केट या मार्गावर बाजारपेठेतील सर्व फळ विक्रेत्यांनी नगरपरिषदेने नेमून दिलेल्या जागेत एका रांगेत व्यवसाय करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सव मंडळांकडून ध्वनिक्षेपकांचा वापर करताना नियमांचे पालन करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. बॅन्जो, स्पीकर तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकांसाठी ऑनलाइन परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत हद्दीतील तसेच शहरातील विसर्जनस्थळी जीवरक्षक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि वाहतुकीला अडथळा न आणता पार पडावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
