गणेशचतुर्थीपूर्वी उपाययोजना करण्याची मनसेची मागणी
मालवण दि प्रतिनिधी
प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मालवणच्या किनारपट्टीवर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून गेल्याच आठवड्यात दोन मच्छीमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . दर एक-दोन महिन्यांनी समुद्रात बुडण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुरक्षाव्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केली असून गणेशचतुर्थीपूर्वी मालवणच्या संपूर्ण किनारपट्टीवर प्रशिक्षित जीवरक्षक, रेस्क्यू बोटी तसेच लाइफ सेव्हिंग किट्स तैनात करावेत, अशा आशयाचे निवेदन मनसेतर्फे भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि मालवण नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले आहे .
मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, आचरा तसेच सिंधुदुर्ग किल्ला परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. जलक्रीडा, बोटिंग यांसह विविध पर्यटन उपक्रमांसाठी पर्यटकांकडून शुल्क आकारले जाते. मात्र, अनेक किनाऱ्यांवर सुरक्षेच्या मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.
अनेक ठिकाणी पुरेशा संख्येने प्रशिक्षित जीवरक्षक उपलब्ध नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचावकार्य करण्यासाठी रेस्क्यू बोटी तसेच प्राथमिक बचावासाठी आवश्यक लाइफ सेव्हिंग साहित्यही उपलब्ध नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्यात अडथळे निर्माण होतात. देवबाग, तारकर्ली, दांडी-मालवण, चिवला आणि आचरा या प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर किमान १० लाइफ सेव्हिंग किट्स तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तसेच किनाऱ्यांवर २४ तास प्रशिक्षित जीवरक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी आणि प्रत्येक प्रमुख किनाऱ्यावर अत्याधुनिक रेस्क्यू बोटी तैनात कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीच्या पर्यटन हंगामापूर्वीच किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
