Headlines

कर्ली-तारकर्ली जलवाहतुकीला मिळणार गती;

‘रिव्हर्स मायग्रेशन’ला पालकमंत्री नितेश राणेंचा बूस्टर..

मालवण दि प्रतिनिधी

स्थानिकांचे मोठ्या शहरांमधील स्थलांतर रोखून त्यांना आपल्याच भागात हक्काचे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे ‘रिव्हर्स मायग्रेशन’ या संकल्पनेवर भर देत असून त्याचाच एक भाग म्हणजे मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूकिबाबत घेतलेली बैठक होय या बैठकीमुळे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या गेल्या अनेक वर्षांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, ही मागणी पूर्ण केल्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक वेगवान, आधुनिक, सुरक्षित आणि जागतिक दर्जाची बनवण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सागरी, खाडी आणि नदीमार्गावरील जलवाहतुकीला गती देण्याबाबत सखोल चर्चा झाली.

या प्रकल्पांतर्गत कर्ली ते तारकर्ली या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सध्या रस्ता मार्गाने जादा वळणांमुळे होणारा २५ ते ३० किलोमीटरचा आणि १ ते २ तासांचा खडतर प्रवास या जलवाहतुकीमुळे अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे पर्यटकांचा व स्थानिकांचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका टाळणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्राथमिक स्तरावर कर्ली तारकर्ली, कर्ली – देवबाग, देवबाग निवती, विजयदुर्ग (अनसुरे दांडे, आरोंदा – किरणपाणी या ५ मार्गांवर ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे.

स्थानिकांचे मोठ्या शहरांमधील स्थलांतर रोखून त्यांना आपल्याच भागात हक्काचे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे ‘रिव्हर्स मायग्रेशन’ या संकल्पनेवर भर देत आहेत.

या प्रकल्पामुळे कर्ली, अनसुरे (विजयदुर्ग) आणि आरोंदा यांसारखे भाग पर्यटनदृष्ट्या वेगाने विकसित होतील. त्यामुळे मुंबई किंवा इतर शहरांत गेलेल्या कोकणातील तरुणांना मूळ गावी परत येऊन स्वतःचा व्यवसाय किंवा रोजगार उभा करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल.

चिपी विमानतळ, वेंगुर्ला तालुका आणि शेजारील गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मालवण, वायरी, तारकर्ली व देवबाग येथे पोहोचणे अधिक सोपे होईल, ज्यामुळे पर्यटकांचा मुक्काम वाढेल. या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर आधुनिक जहाजबांधणी आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्रांना मोठा वाव मिळेल.

जलवाहतुकीसोबतच हॉटेल्स, होमस्टे, वॉटर स्पोर्ट्स, गाईड्स आणि इतर पर्यटन व्यवसायांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासात आणि ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या प्रवासात हा प्रकल्प एक सुवर्णपान ठरेल, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष मोंडकर यांनी व्यक्त केला

You cannot copy content of this page