Headlines

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला मध्यरात्री आग…

शॉर्ट सर्किटमुळे विद्युत उपकरणे जळून खाक:सुदैवाने जीवितहानी टळली..

⚡कणकवली ता.०८-: तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत रुग्णालयातील अनेक विद्युत उपकरणे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आतील विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. आग मोठी असल्याने टेलिमेडिसिनचा कॉम्प्युटर, प्रिंटर, वॉटर प्युरिफाय मशीन, वायर सप्लायर, एक टीव्ही, दोन टेबल, एक खुर्ची आणि दोन पंखे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कॉम्प्युटरचा स्फोट झाल्याने खिडक्यांच्या काचा फुटल्या असून खिडक्यांना लावलेले पडदेही जळून खाक झाले आहेत.

रुग्णालय रात्री बंद असल्याने आगीचा धूर बाहेर निघू शकला नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंती आणि सीलिंग धुरामुळे काळेकुट्ट झाले. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद पडली असून काही कॅमेरे आगीत जळाले.

ही आग सकाळच्या सत्रात रुग्ण तपासणी सुरू असताना लागली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र आग मध्यरात्री लागली आणि त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणताही रुग्ण दाखल नव्हता. कार्यालयातही कोणी उपस्थित नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी जिल्हा परिषद सदस्य तथा खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्राची इसवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले आणि वारगाव सरपंच नाना शेट्ये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तत्काळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

दरम्यान, खारेपाटण येथील वीज कार्यालयाचे वीज अभियंता सकपाळ हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम ट्रान्सफॉर्मरमधून होणारा वीजपुरवठा बंद केला आणि त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुन्या विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.

याबाबत खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिल्याचे सांगितले.

कर्मचारी पदे भरण्याची मागणी

खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई किंवा सुरक्षा रक्षकाची व्यवस्था नाही. त्यामुळे मध्यरात्री लागलेली आग तातडीने कोणाच्याही निदर्शनास आली नाही. सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र उघडल्यानंतर ही घटना कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेली कर्मचारी वर्गाची पदे तातडीने भरण्यात यावीत. तसेच खारेपाटणसह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील विद्युत पुरवठा व्यवस्थेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य प्राची इसवलकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page