Headlines

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांसमोर सिंधुदुर्गातील प्रश्नांचा पाढा…

सिंधुदुर्ग उपकेंद्रातूनच सर्व शैक्षणिक सेवा द्या:मंदार शिरसाट यांची निवेदनातून मागणी..

⚡कुडाळ ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांना सविस्तर निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सिनेट सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक व संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत थेट संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मुंबईपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या शैक्षणिक कामांसाठी तसेच समस्या सोडविण्यासाठी वारंवार मुंबई विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसला जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या चार प्रमुख समस्यांकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

निकालातील विलंब व त्रुटी दूर करण्याची मागणी : अनेक परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होत नाहीत. तसेच निकालामध्ये विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविणे, गुणांमध्ये गल्लत होणे यांसारख्या त्रुटी आढळून येतात. या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांचा विलंब थांबवावा : परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे वेळेत मिळत नसल्याने पुढील उच्च शिक्षण किंवा रोजगाराच्या संधींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी करण्यात आली.
पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेत देण्याची मागणी : पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्याचा निकाल पुढील परीक्षेचे अर्ज भरण्यापूर्वी अथवा पुढील परीक्षा सुरू होण्यापूर्वी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सिंधुदुर्ग उपकेंद्राचा विस्तार करण्याची मागणी : मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र असतानाही अनेक प्रशासकीय कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबईतील मुख्य कॅम्पसवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राचा विस्तार करून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व शैक्षणिक व प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे झालेल्या थेट संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या. सिनेट सदस्यांनी या समस्या जाणून घेत त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
मुंबई विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक किंवा प्रशासकीय अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा निलेश गवळी, मयूर पांचाळ, आनंद वैद्य, अरविंद शिरसाट, महेंद्र गवस, प्राचार्य स्मिता सुरवसे, नगरसेवक मंदार शिरसाट, योगेश धुरी, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, विनय पालकर यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

You cannot copy content of this page