बांदा/प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आज बांदा येथे महामार्गाची तसेच अवजड वाहतूक पार्किंगच्या जागेची पाहणी केली. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या.
गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असल्याने महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ होते. तसेच अवजड वाहनांची वाहतूक व पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मीना यांनी बांदा परिसरातील महामार्गाची पाहणी करून वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला. सटमठवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या जागेची देखील पाहणी केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह महामार्ग वाहतूक पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पोलिसांना दिल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांद्यात महामार्गाची पाहणी
