आयशर टेम्पोसह पायलटिंग करणारी इनोव्हा जप्त; सहा जणांविरुद्ध गुन्हा
कणकवली : देवगडहून कोल्हापूरच्या दिशेने १६ जनावरांची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो तरेळे येथे पकडण्यात आला. या टेम्पोमध्ये चारापाणी न देता दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत १६ बैल आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी जनावरांसह आयशर टेम्पो आणि त्याला पायलटिंग करणारी इनोव्हा कार ताब्यात घेतली. याप्रकरणी टेम्पो चालकासह इनोव्हा कारमधील पाच जणांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ सप्टेंबर रोजी पहाटे २ वा. च्या सुमारास तरेळे येथील वामनराव महाडिक महाविद्यालयासमोरील गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत हा प्रकार उघडकीस आला. तरेळे येथील गोरक्षक तेजस भांबुरे यांनी जनावरांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडून ठेवला होता. या टेम्पोच्या पुढे पायलटिंग करणारी इनोव्हा कार जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर खारेपाटण चेकपोस्टवर पोलिसांनी ( एमएच १२ एचक्यू ७३७३ ) क्रमांकाची इनोव्हा थांबवली. त्या कारमध्ये संदीप प्रकाश पाटील (४७), सुधाकर मारुती साळोखे (५८), राकेश सुनील मरगळे (३०), सौरभ सुधाकर साळोखे (२७) आणि पांडुरंग धोंडीबा चव्हाण (६५), सर्व राधानगरी परिसरातील रहिवासी, आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तरेळे येथे जाऊन ( एमएच ०९ जी जे ४७९३ ) क्रमांकाचा आयशर टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोची पाहणी केली असता त्याच्या मागील हौद्यात १६ बैल दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. जनावरांना पुरेसे चारापाणी उपलब्ध नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. टेम्पो चालक प्रदीप भुपाल कुंभार (३६, रा. मानकापूर, ता. निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक) याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे समोर आले.
या जनावरांपैकी काही बैल देवगड तालुक्यातील दहिबाव येथील संतोष रामचंद्र राणे, अनिल नामदेव नवलू आणि देवगड तालुक्यातील कोटकामते- दाभलवाडी येथील तुकाराम शंकर मोंडे यांच्या मालकीचे असल्याचे चालकाने सांगितले आहे. ही जनावरे कोल्हापूर येथे नेली जात असल्याचेही उघड झाले.
या कारवाईत सुमारे आठ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, चार लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि १६ बैल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. बैलांची एकूण किंमत अंदाजे १ लाख ४३ हजार रुपये करण्यात आली आहे. या प्रकरणी मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १९२ A, ६६, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(d), ११(१)(e), ११(१)(f), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ बी, ९, भारतीय न्याय संहिता (बीएनएस २०२३) चे कलम ३(५) नुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.
बॉक्स :
रात्री पावणे चारला पालकमंत्र्यांनी फोन उचलून केले सहकार्य ; गोरक्षकांनी मानले आभार
जनावरांची अवैध वाहतूक पकडल्यानंतर पुढील कारवाईसाठी गोरक्षकांनी पहाटे पावणे चारच्या सुमारास पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला. रात्रीची वेळ असूनही पालकमंत्री नितेश राणे यांनी फोन उचलून तत्काळ सहकार्य केले. या मदतीबद्दल गोरक्षकांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
