मालवण दि (प्रतिनिधी)
तालुका क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ विविध खेळांच्या स्पर्धा नव्हेत, तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याला, जिद्दीला, आत्मविश्वासाला आणि खिलाडूवृत्तीला व्यासपीठ मिळवून देणारा एक उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, खेळाडूंनी नियमांचे पालन करतानाच खिलाडूवृत्ती जोपासत यश संपादन करताना आपल्या बरोबरच आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन मालवणच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांनी येथे बोलताना केले.
क्रीडा व युवक संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या मैदानावर तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धाना आजपासून प्रारंभ झाला. या क्रीडा स्पर्धाचे उदघाटन पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर पं. स. सदस्य, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल नाईक, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, तालुका क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, मालवण तालुका क्रीडा समन्वयक संजय पेंडूरकर, क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर, महेंद्र वारंग, शैलेश मुळीक, नितीन हडकर, श्री. कुडव, रेनोल्ड बुतेलो, पंकज राणे, श्रीनाथ फणसेकर, आर. बी. देसाई आदी व इतर उपस्थित होते.
प्रारंभी तालुका क्रीडा समन्वयक संजय पेंडूरकर यांनी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापिका सौ. गावडे यांनी स्वागत केले. यावेळी पं. स. सदस्य दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने खेळालाही तेवढेच महत्व आहे, अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करावी, असे सांगितले. यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण, पं. स. सदस्य दीपक चव्हाण यांचा तसेच रेकोबा हायस्कुलचे क्रीडा शिक्षक श्रीनाथ फणसेकर, भंडारी हायस्कुलचे क्रीडा शिक्षक आर. बी. देसाई यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी किसन हडलगेकर यांनी आभार मानले. आजच्या पहिल्या दिवशी शालेय स्तरावरील कबड्डी सामने पार पडले.
