अतुल रावराणे:करुळ येथील काजू प्रकल्पात प्रक्रिया उद्योग ; काजू शेतक-यांनी भागधारक होण्यासाठी अर्ज भरावेत..
⚡कणकवली ता.०७-: राजकारणात शब्द देणे सोपे असते. मात्र, दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद आणि प्रामाणिकपणा माझ्यात आहे. कोविड काळात सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी काजू प्रकल्प उभारण्याचा शब्द दिला होता. आता काजू प्रक्रिया कारखाना करुळ येथील खरेदी केला आहे. चार वर्षे काजू कलमे वाटप केली. त्या शेतकऱ्यांनी काजू उत्पादन घेतल्यानंतर त्यांना योग्य बाजारपेठ मिळणार कशी, हा प्रश्न होता. त्यावेळी शेतकऱ्यांना काजू प्रक्रिया कारखाना देण्याचे आश्वासन दिले होते. या कारखान्यातील ५० टक्के भागीदारी शेतकऱ्यांची असेल, अशी माहिती भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी उपाध्यक्ष समीर रावराणे , गुळाजी काळे आदींसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोविडमध्ये बाहेरगावी असलेले अनेक तरुण सिंधुदुर्गात परतले होते. या परिस्थितीत जिल्ह्यातील पारंपरिक पिकांना चालना देऊन स्थानिक पातळीवर रोजगार आणि उत्पन्नाची साधने निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून काजू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सुमारे ५० हजार काजू कलमे तसेच सेंद्रिय खताचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. ज्या शेतक-यांनी आमच्याकडून काजू कलमे नेलीत, त्यांनी भागधारक बनण्यासाठी आमच्याकडे अर्ज करावयाचे आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क असणार नाही. शिरगांव येथील तावडे हॉटेल, वैभववाडी येथील माझे निवासस्थान, दर्शन कॅश्यू कारखाना करुळ किंवा कणकवली येथील कार्यालयात अर्ज सादर करावेत. या कारखान्याच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून या संचालक मंडळात समीर रावराणे अध्यक्ष, सुरेंद्र तावडे उपाध्यक्ष, अतुल रावराणे, रोहन रावराणे, सुहास गुरव, दीपक बाईत, धुळाजी काळे, चारुलता रावराणे , नलिनी पाटील यांचा समावेश आहे. या हंगामात शेतकऱ्यांना स्वतःचा काजू कारखाना सुरू झालेला असेल आपल्या कारखान्यात आपला काजू घालता येई असे अतुल रावराणे यांनी जाहिर केले.
शेतकरी जो शेअर्स अर्ज करेल त्याला एकही रुपया भरण्याची गरज नाही. शेतकरी कारखान्यात काजू आणेल आणि तो आपोआप भागधारक होईल. दलाल, मध्यस्थ किंवा एजंटांना भागधारक केले जाणार नाही. प्रत्यक्ष काजू उत्पादक शेतकऱ्यांनाच भागीदारी दिली जाईल.यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा उतारा व त्यावर काजू पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा आतापर्यंत दरवर्षी सुमारे १० ते १२ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. कणकवली, वैभववाडी आणि शिरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा यात मोठा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. देवगडमध्ये तुलनेने कमी, तर विजयदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी आहेत.
फणस प्रक्रिया युनिटलाही चालना देणार
काजूनंतर आता सिंधुदुर्गातील पारंपरिक फणस पिकाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी त्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे काजू कारखान्याच्या परिसरात फणस प्रक्रिया युनिट सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पारंपरिक पिकांच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे. काजू आणि फणस यांसारख्या पिकांना प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगारही निर्माण होईल, असे अतुल रावराणे यांनी सांगितले.
