Headlines

रानभाज्या म्हणजे कोकणच्या मातीची ओळख..

वेदिका परब:‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जाई सुनील नाईक प्रथम..

⚡वेंगुर्ले ता.०७-: रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनमोल ठेवा असून, हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन वेदिका विशाल परब यांनी केले.
माझा वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहर स्तर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री. विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन वेदिका विशाल परब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर व भाजपा जेष्ठ नेते राजु राऊळ , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना वेदिका परब म्हणाल्या, “रानभाज्या म्हणजे आपल्या कोकणच्या खाद्यपरंपरेची ओळख आहे. पूर्वीच्या पिढ्यांच्या आहारात रानभाज्यांना महत्त्वाचे स्थान होते. बदलत्या जीवनशैलीमुळे या पारंपरिक खाद्यपदार्थांचा वापर कमी होत आहे. त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीला समजावून सांगण्याबरोबरच त्यांचा विविध प्रकारे आहारात समावेश करण्याची गरज आहे.”
रानभाज्यांपासून केवळ पारंपरिक भाजीच नव्हे, तर विविध चविष्ट आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करता येतात. या स्पर्धेत सहभागी महिलांनी दाखवून दिलेली कल्पकता कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे महिलांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळते आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतनही होते, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली ही नैसर्गिक खाद्यसंपदा जपणे आवश्यक आहे. “रानभाज्या हा आपल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या परंपरेचे जतन करण्यासाठी आणि पुढील पिढीला त्याची ओळख करून देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी विविध रानभाज्यांचा कल्पक वापर करून लाडू, मोदक, सरबत, चटणी, सूप, अप्पे यांसह विविध पदार्थ सादर केले. पारंपरिक पाककृतींना आधुनिक सादरीकरणाची जोड देत स्पर्धकांनी आपल्या पाककौशल्याचे दर्शन घडविले.
जाई नाईक प्रथम
स्पर्धेत जाई सुनील नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी टायकाळ्याचे लाडू, मोदक, सरबत व चटणी हे पदार्थ सादर केले.
द्वितीय क्रमांक : सुश्मिता रामचंद्र गावकर — लाजरीचे मोदक, लाडू व पेव्याचे सूप.
तृतीय क्रमांक : सुजाता गुरुराज साटम — चाईच्या मोहराची जास्वंद.
उत्तेजनार्थ प्रथम : अनुष्का आनंद राणे — मिक्स भाज्यांचे सूप.
उत्तेजनार्थ द्वितीय : जानव्ही तुळशीदास सावंत — कर्टुलाचे अप्पे व लाजाळूची चटणी.
उत्तेजनार्थ तृतीय : मंगेश सुहास माणगावकर — शेवगा-कर्टुलीयुक्त लाडू.
स्पर्धेचे परीक्षण रश्मी राजेश कुडाळकर, डॉ. भारतेंदू भरत भारती आवळे आणि डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले. चव, पाककृतीतील नावीन्य, रानभाज्यांचा प्रभावी वापर, पौष्टिकता व सादरीकरण या निकषांवर स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले.
रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक खाद्यपरंपरेचे जतन, नैसर्गिक व पौष्टिक आहाराचा प्रसार आणि महिलांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला.
यावेळी व्यासपीठावर इनर्व्हील क्लब अध्यक्ष – सौ ज्योती देसाई ,उपाध्यक्ष – सौ.सई चव्हाण , सेक्रेटरी – सौ.श्रिया परब , ट्रेझरर – सौ.वृंदा गवंडळकर ,एडिटर – सौ. आरती गिरप ,हिरकणी शहर स्तर संग अध्यक्ष सौं आकांक्षा परब , उपाध्यक्ष अस्मिना मकानदार ,शिवानी तामणेकर , रसिका राऊळ , राधा बागवे माझा वेंगुर्ला चे राजन गावडे , यासीरशहा मकानदार , खेमराज कुबल , अमृत काणेकर , महेश वेंगुर्लेकर , अवधुत नाईक, अमृत काणेकर, रामचंद्र शृंगारे, ऋतुजा गावडे, अमोल खानोलकर, प्रथमेश घारे, श्रेयस गावडे, भूषण मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

You cannot copy content of this page