Headlines

सोने अडकले, आशा मात्र कायम…

सोनेतारण प्रकरणी पीडित महिलांना श्वेता कोरगावकर यांचा दिलासा:कायदेशीर लढ्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन..

⚡मालवण ता.०७-: मुथूट पिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या मच्छीमार महिला व अन्य पीडितांची बैठक मालवण येथील संस्कार हॉल, धुरीवाडा येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीस भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी उपस्थित राहून पीडितांच्या व्यथा जाणून घेतल्या तसेच पुढील कायदेशीर लढ्याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रकरणात सुमारे १२० मच्छीमार महिला व अन्य व्यक्तींची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित वित्तीय संस्थेत सुमारे नऊ किलोपर्यंत सोने अडकले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आणखी काही नागरिक तक्रारीसाठी पुढे येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत उपस्थित पीडित महिलांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती श्वेता कोरगावकर यांच्यासमोर मांडली. महिलांशी संवाद साधताना कोरगावकर यांनी प्रकरणाबाबत आपण गंभीर असून, पीडित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला आयोगाकडे दाद मागण्याच्या दृष्टीनेही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर श्वेता कोरगावकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपाधीक्षक नयोमी साटम यांची भेट घेतली आणि प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती जाणून घेतली.
दरम्यान, संपूर्ण प्रकरणात आपल्याला साथ देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल उपस्थित पीडित महिलांनी श्वेता कोरगावकर यांचे आभार मानले.
यावेळी भाजप गटनेत्या अन्वेशा आचरेकर, माजी महिला व बालकल्याण सभापती पूजा सरकारे, श्रमजीवी रापण संघाचे दिलीप घारे, मुख्य तक्रारदार तथा कोळंब सरपंच सिया धुरी, कविता मोंडकर, रुपेश प्रभू, दाजी जोशी, माधुरी प्रभू, कायदेशीर सल्लागार तसेच मोठ्या संख्येने पीडित मच्छीमार महिला व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page