Headlines

ओंकार हत्तीचा नेतर्डेत पुन्हा धुडगूस; केळी-माड बागायतीची नासधूस…

​बांदा : प्रतिनिधी
नेतर्डे गावात ‘ओंकार’ हत्तीने पुन्हा एकदा धुडगूस घालत शेतकरी लाडू गवस यांच्या केळी व माड बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास हत्तीने उध्वस्त केल्याने हताश झालेल्या लाडू गवस यांना अश्रू अनावर झाले. आम्हाला ​नुकसान भरपाई नको, आधी हत्तीला तिलारी नैसर्गिक अधिवासात सोडा, अशी स्थानिकांनी आग्रही मागणी केली आहे.

नेतर्डे – गावठणवाडी येथील वृद्ध शेतकरी लाडू गवस यांनी मोठ्या कष्टाने मंडल जातीच्या केळीची बागायती केली होती. मात्र, ओंकार हत्तीने संपूर्ण केळी बागायती व माडांची नासधूस केली. बागायतीची अवस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. आम्हाला शासनाची तुटपुंजी नुकसान भरपाई नको. झाडांवर आमचा जीव आहे. ओंकार हत्तीला तिलारी नैसर्गिक अधिवासात सोडा, अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली आहे.

हत्तीचे अचूक लोकेशन देण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. वनविभागाचे हाकारी पथक हत्तीचा शोध घेण्याऐवजी एखाद्या मंदिरात किंवा शेडमध्ये झोपून राहतात. त्यांच्यासोबत वनविभागाचा एकही कर्मचारी नसतो. हत्तीच्या नावाखाली शासनाचा निधी लाटण्याचा वन अधिकाऱ्यांचा खटाटोप असल्याचा गंभीर आरोप उपसरपंच प्रशांत कामत यांनी केला.

हाकारी पथकात दोडामार्ग तालुक्यातील युवक आहेत. त्यांना या परिसराची माहिती नसल्याने ते हत्तीचा शोध घेण्याऐवजी रस्त्यावरच थांबून राहतात. बागायती सफाईचे काम सुरु असून हत्तीने एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला केल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्रशांत कामत यांनी उपस्थित केला.

नुकसाग्रस्त बागायती व शेतीचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी प्रशांत कामत यांनी केली आहे.

चौकट
ओंकारला तिलारीत कळपात नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी त्याला शिरवल धरणा पर्यंत नेण्यातही आले होते. मात्र, ओंकार पुढे न जाता मागे फिरला. स्थानिक ग्रामस्थांना हत्तीचे लोकेशन कळावे यासाठी पथकाला स्पीकर दिला जाईल. जेणेकरून स्थानिक अलर्ट होतील.

संभाजी पाटील, वन अधिकारी, दोडामार्ग

फोटो –
नेतर्डे येथील शेतकरी लाडू गवस यांच्या केळी व माड बागायतीची हत्तीने केलेली नासधूस.

You cannot copy content of this page