Headlines

कुडाळ गणेश घाटाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण..

गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष ट्रॉली व सुरक्षा पथक:शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार..

⚡कुडाळ ता.०७-: कुडाळ नगरपंचायत आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या गणेश घाट व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सोमवारी दिमाखात पार पडले. कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच गणेशोत्सव काळात भाविकांना सुरक्षित व सुलभ विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे काम लवकर पूर्ण झाल्याचे सांगितले. गणेशोत्सव काळात भाविकांची सुरक्षा ही नगरपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोठ्या व वजनदार गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी विशेष ट्रॉलीची व्यवस्था करण्यात येणार असून, भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथकही तैनात केले जाणार आहे. यावेळी त्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले.

‘तारखा आणि पुराव्यांसह कामाचा हिशोब देतो’

विकासकामांच्या श्रेयावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना आमदार निलेश राणे म्हणाले की, कोणत्याही शासकीय कामासाठी शासन निर्णय (जीआर) आणि निविदा प्रक्रिया महत्त्वाची असते. गणेश घाटाच्या कामाचा जीआर २२ जून २०२५ रोजी निघाला, १ सप्टेंबर २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध झाली, तर २९ ऑक्टोबर २०२५ रोजी भूमिपूजन झाले. या कामासंदर्भातील प्रशासकीय मंजुऱ्या आणि आदेश आपल्या कार्यकाळात झाल्याचे त्यांनी सांगितले.   “आम्ही केवळ बोलत नाही, तर तारखा आणि पुराव्यांसह कामाचा हिशोब देतो,” असे राणे यांनी स्पष्ट केले.

‘शकुनी’ राजकारणाला विकासानेच उत्तर देणार

माजी आमदारांवर टीका करताना निलेश राणे यांनी त्यांच्या भूमिकेची तुलना ‘शकुनी’शी केली.  राजकारणात नकारात्मकता आणि प्रतिशोधाला स्थान न देता विकासकामांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 “आम्ही दोनदा पराभूत झालो, तरी बदल्याचे राजकारण केले नाही. कुडाळच्या विकासात कोणतीही नकारात्मकता आड येऊ देणार नाही. केवळ मंत्र्यांसमोर हात बांधून उभे राहण्यापेक्षा जनतेच्या हक्काचा निधी कसा आणायचा, हे आम्ही दाखवून दिले आहे,” असे राणे म्हणाले.

‘दहा वर्षांची विकासाची पाटी कोरी’

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी मागील दहा वर्षांच्या काळात विकासाची पाटी कोरी राहिल्याची टीका केली. आमदार निलेश राणे यांनी अवघ्या दोन वर्षांत रस्ते, पाणी, वीज तसेच शेतकरी व मच्छीमारांचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांचा पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही माजी आमदारांच्या कार्यकाळावर टीका करत घोटगे-सोनवडे घाट, मालवण-देवबागसाठी १७२ कोटी रुपये आणि तोंडावली-तळाशीलसाठी १४ कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा केला. विकासकामांबाबत खोडसाळ विधाने करण्याऐवजी वस्तुस्थितीवर चर्चा व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.

कुडाळ शहराच्या विकासाचा कायापालट करण्याचा निर्धार

आगामी काळात मच्छिंद्र कांबळे नाट्यगृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसेच डीपीआर रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. “आपण जनतेचे मालक नसून सेवक आहोत. आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून शहराच्या गरजांनुसार दर्जेदार कामे झाली पाहिजेत,” असा सल्ला त्यांनी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दिला.
मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या पाच ते आठ महत्त्वाच्या विकासकामांचा तातडीने पाठपुरावा करून ती कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

You cannot copy content of this page