जुन्या आठवणींना मिळणार उजाळा; शाळेच्या भविष्यातील विकासावर होणार मंथन..
⚡सावंतवाडी ता.०७-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात करण्यात आले आहे.
पंचक्रोशीतील जागरूक नागरिकांच्या पुढाकारातून काही दशकांपूर्वी सुरू झालेल्या या विद्यालयामुळे आरोस, साटेली, तळवणे, मळेवाड, दांडेली आणि सातार्डा परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या गावाजवळच माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाने सातत्याने शाळेच्या शैक्षणिक तसेच भौतिक विकासासाठी योगदान दिले आहे.
संस्थेच्या सहकार्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आणि माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सन २०२५ मध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार असून, शाळेच्या भविष्यातील विकासासाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय माजी विद्यार्थी संघाच्या सदस्य नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या स्नेह मेळाव्यास प्रशालेचे सर्व माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
