हर्षदा वाळके यांच्या हस्ते उद्घाटन, संदेश पारकर यांच्या हस्ते विक्रीचा शुभारंभ
कणकवली: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिला उद्योजिकांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाची थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पूर्णानंद महिला मंचाच्या वतीने आयोजित ‘उत्सवी वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवा’ला अत्यंत उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते फीत कापून या महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते एकदंत गणेशाचे पूजन व श्रीफळ वाढवून अधिकृत विक्रीचा शुभारंभ करण्यात आला, तर नगरसेविका डॉ. सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यानंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. विविध वस्तू कशा तयार केल्या जातात, त्यांचे वैशिष्ट्य काय आहे आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. महिलांच्या मेहनतीचे कौतुक करताना ते म्हणाले, “महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना अधिकाधिक ग्राहक मिळावेत आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी भविष्यात अशा महोत्सवांचे आयोजन शहरात अधिक वर्दळीच्या व प्रशस्त ठिकाणी केले जाईल. त्यासाठी नगरपंचायतीकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.”
यावेळी सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’ ही पारंपरिक संकल्पना आता बदलली असून, महिला स्वतःच्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठत आहेत. त्या केवळ स्वतःपुरत्या मर्यादित न राहता एकमेकींना साथ देत पुढे जात आहेत. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ यशस्वी’ हाच आजच्या महिलांच्या प्रगतीचा मूलमंत्र आहे. अशा प्रदर्शनांमुळे महिलांना कौशल्याचे सादरीकरण करण्यासोबतच आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळते. त्यामुळे नागरिकांनी या वस्तूंना प्राधान्याने खरेदी करून महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे.
कुडाळ देशकर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष हेमंत परुळेकर म्हणाले, पूर्वी समाजाच्या विविध स्तरांवर महिला मुक्तीच्या संकल्पनेवर कार्यक्रम आयोजित केले जात असत. मात्र, काळ बदलला असून आज महिला स्वतःच्या सामर्थ्यावर सक्षम झाल्या आहेत. त्यांच्यात स्वतंत्र निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुरुषांनीही आत्मपरीक्षण करून महिलांच्या प्रगतीला अधिक पाठबळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात गणेश सजावटीच्या साहित्यासह सणासाठी आवश्यक असलेल्या विविध सणपूरक व उत्सवी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. घरगुती कौशल्याला व्यवसायाची जोड देऊन उभारलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उद्घाटन सोहळ्यास कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. जाधव, कुडाळ देशकर समाज मंडळाचे अध्यक्ष दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत, अशोक नेरुरकर, ठाकूर गुरुजी, उदय ठाकूर, कमलाकर महाजन यांच्यासह पूर्णानंद महिला मंचाच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा विक्री महोत्सव आज रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी तसेच महिलांच्या कष्टाला आणि कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पूर्णानंद महिला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
