जखमी महिलेचा गोव्यात उपचारादरम्यान मृत्यू

कणकवली : कणकवली ते कुडाळ असा दुचाकीने प्रवास करताना वागदे येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान २७ ऑक्टोबर रोजी गोवा – बांबुळी येथील रुग्णालयात मृत्यू झाला. प्राची प्रदीप मसुरकर (वय ३२, रा. हिर्लोक, कुडाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील सुनील शिवराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून दुचाकीचालक उमेश प्रदीप कदम (वय ३४, रा. आंब्रड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राची मसुरकर या कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होत्या. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास त्या उमेश कदम यांच्या दुचाकीवरून कुडाळच्या दिशेने जात होत्या. मुंबई – गोवा महामार्गावरील वागदे येथील विश्रांती हॉटेलसमोर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात उमेश कदम आणि प्राची मसुरकर हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी ओरोस येथे दाखल करण्यात आले. प्राची यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा – बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना २७ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
