Headlines

सावंतवाडी जि.प. शाळा क्रमांक ६ मध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात…

रानभाज्या, औषधी वनस्पतींची ओळख; वृक्षारोपण व वृक्ष रक्षाबंधनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

⚡सावंतवाडी, ता.०३-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी क्रमांक ६ येथे रानभाजी महोत्सव, वृक्षारोपण, वृक्ष रक्षाबंधन, औषधी वनस्पतींची ओळख तसेच पौष्टिक पदार्थांची मेजवानी अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्थानिक रानभाज्या, औषधी वनस्पती आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

कार्यक्रमास सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, माजी केंद्रप्रमुख सरिता मुननकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्षा पूनम तुयेकर, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, गुरुप्रसाद तेजम, जान्हवी वारीक, संगिता चव्हाण, ज्येष्ठ शिक्षिका सायली लांबर, मुख्याध्यापक केशव जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पानाफुलांपासून तयार केलेली पर्यावरणपूरक राखी शाळेच्या आवारातील कल्पवृक्षाला बांधून वृक्ष व निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी गीते व कृतीच्या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात अळूची पाने, शेवगा, कारटुले, केळफूल, भारंगी, अंबाडी, टाकळा, चिवारीचे कोंब, पेवगा, कुर्डू, भोपळ्याची फुले, त्रिफळे आदी विविध रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. तसेच पानफुटी, गवती चहा, तुळस, ओवा, वेखंड, अडुळसा, सुरपीन आदी औषधी वनस्पतींचीही माहिती देण्यात आली.
नाचणीची भाकर, अळुवड्या, पातोळ्या, शेवग्याची भाजी यांसह विविध पौष्टिक पदार्थांची मेजवानीही यावेळी ठेवण्यात आली होती. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक वनस्पती आणि आरोग्यदायी आहार यांची माहिती मिळाली. उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सायली लांबर, मुख्याध्यापक केशव जाधव, गुरुप्रसाद तेजम, समीक्षा खोचरे, पूनम तुयेकर, जान्हवी वारीक, प्रांजल जाधव, पूनम गौंड, मेघा शर्मा तसेच विद्यार्थी व पालकांचे विशेष योगदान राहिले.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर यांचा वाढदिवसानिमित्त फुलझाड देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी केंद्रप्रमुख सरिता मुननकर यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी एक हजार रुपयांची मदत दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपक्रमशील शिक्षिका सायली लांबर यांनी उपस्थितांचे आभार मानले. रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण, पारंपरिक आहार आणि आरोग्य यांची सांगड घालणारा आगळावेगळा अनुभव मिळाला.

You cannot copy content of this page