ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद..
⚡कुडाळ ता.२८-: कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी अजय नरेंद्रसिंह यादव याला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. इंदलकर यांनी 25 ऑगस्ट 2026 रोजी हा आदेश दिला.
कुडाळ पोलीस ठाण्यातील C.R. No. 47/2026 मध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम 75(1)(iii), 78(2), 316(5), 318(4) सह कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी 22 जुलै 2026 पासून न्यायालयीन कोठडीत होता. प्रकरणात काही रक्कम आरोपीच्या खात्यात/UPI खात्यात जमा झाल्याचा अभियोजनाचा मुख्य आधार होता. मात्र, संबंधित मोबाईल क्रमांकाचा वापर आरोपीनेच केला होता का, तसेच UPI व्यवहाराचा कथित गुन्ह्याशी थेट संबंध आहे का, याबाबतचा अंतिम निष्कर्ष पुराव्यांच्या आधारे खटल्यातच काढता येईल, असा युक्तिवाद ॲड. बिले यांनी केला.
आरोपीचा मोबाईल तपास यंत्रणेने आधीच जप्त केला असून पुढील कोठडीची विशिष्ट आवश्यकता अभियोजनाने दाखवून दिलेली नाही, तसेच आरोपीने तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असल्याचे न्यायालयाने विचारात घेतले. त्यामुळे कठोर अटींच्या अधीन राहून आरोपीची पुढील कोठडी आवश्यक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने ₹50,000 च्या वैयक्तिक जातमुचलका व इतर अटी शर्ती वर आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
सदरील कामामध्ये ॲड. राजीव बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांचे सहकार्य लाभले.
