Headlines

ओपीडीसमोरील सांडपाण्याचा प्रश्न, निकृष्ट साहित्याच्या खरेदीची चौकशी करा..

रुपेश पावसकरांची मेडिकल कॉलेज नवनियुक्त अधिष्ठातांकडे मागणी..

⚡कुडाळ ता.२८-: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ. शिंदे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) समोरील गटारामध्ये पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र साचत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची तसेच साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी पावसकर यांनी केली.
यासोबतच महाविद्यालयातील पूर्वीच्या अधिष्ठातांच्या कार्यकाळात खरेदी करण्यात आलेल्या वस्तू व वैद्यकीय साहित्याच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. संबंधित साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत या खरेदी प्रक्रियेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पावसकर यांनी नवनियुक्त अधिष्ठातांकडे केली.
रुग्णालयातील रुग्णांना चांगल्या सुविधा मिळणे तसेच परिसर स्वच्छ व आरोग्यदायी राहणे आवश्यक असून, प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, ओरोस येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष परब यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांनी मांडण्यात आलेल्या समस्यांची दखल घेत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page