Headlines

श्रावण मेळ्यात भक्तीगीतांची सुरेल मैफिल…

भजनी व दशावतारी कलावंतांचा सन्मान:लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचा उपक्रम;गणेश भक्तांना पूजा साहित्य वाटप व स्वच्छता मोहिमेचे आयोजन..

⚡कणकवली ता.२६- : तालुक्यातील हळवल परबवाडी येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून श्रावण मासाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत श्रावण मेळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुरेल भावगीते व भक्तिगीतांची संगीत संध्या रंगली. तसेच हळवल गावातील भजन मंडळ व दशावतार मंडळाचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला.

या संगीत मैफिलीत गायक विनय वझे, गायक सागर राठवड आणि गायिका आर्या आचरेकर यांनी सुमधुर भक्तिगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तबला साथ प्रेम मेस्त्री, पखवाज साथ गौरव वझे व सतीश गावडे, तर तालरक्षक म्हणून जीवन मेस्त्री यांनी साथसंगत केली.

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रावण मेळ्यात हळवल गावातील भजन मंडळ व दशावतार मंडळाचा सन्मान करण्यात आला. यावेळी भजनी मंडळ व दशावतार मंडळांना भजनी साहित्य देऊन गौरविण्यात आले. उपस्थित भजनी व दशावतारी कलावंतांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.

श्रावण मासाच्या सुरुवातीला गावातील मूर्तिकारांचा सन्मान सोहळाही मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. पुढील काळात स्वच्छता मोहीम राबविण्यासोबतच हळवल गावातील सर्व गणेश भक्तांना पूजा साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष लवू परब यांनी दिली.

यावेळी हळवलचे मानकरी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अरुण राऊळ यांनी मानले.

You cannot copy content of this page