Headlines

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गातील युवकांना पंतप्रधान मोदींशी संवादाची संधी

कणकवलीतील एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात व्हर्च्युअल संवादाचे आयोजन:देशभरातील १६०० ठिकाणांहून ८ लाख युवकांचा सहभाग..

कणकवली : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘माय भारत’ (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील १६०० ठिकाणांहून सुमारे ८ लाख युवक या कार्यक्रमात सहभागी होणार असून, पंतप्रधान मोदी त्यांना संबोधित करणार आहेत.

कणकवलीत होणार आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्रम दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. कणकवली येथील एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडक संस्थांमधील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक आणि युवक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध खेळाडूही सहभागी होणार असल्याने युवकांना त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेण्याची संधी मिळणार आहे.

युवकांच्या कल्पनांना राष्ट्रीय स्तरावर वाव

‘माय भारत’ आणि एनएसएस स्वयंसेवकांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रम, सामुदायिक तंदुरुस्ती कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, सर्वसमावेशक क्रीडा उपक्रम, युवकांच्या नेतृत्वाखालील फिटनेस उपक्रम तसेच आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या कल्पनांचा यामध्ये समावेश आहे. सर्वोत्तम आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करून त्यांची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन

भारतीय हॉकीचे जादूगार आणि महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. युवकांमध्ये क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी ‘माय भारत सिंधुदुर्ग’ आणि एनएसएस विविध शैक्षणिक संस्था व संबंधित घटकांशी समन्वय साधणार आहेत.

You cannot copy content of this page