Headlines

समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेणार

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत यांची माहिती

कणकवली : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरण, महावितरण, एसटी यांसह विविध विभागांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जनता दरबार घेण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती हर्षदा वाळके व उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी, सार्वजनिक बांधकाम यासह अन्य विभागांनी तातडीची कामे पूर्ण करून घ्यावीत. ग्रामस्थांच्या कोणत्याही तक्रारी राहणार नाहीत, याची संबंधित विभागांनी काळजी घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

कणकवली पंचायत समितीची मासिक सभा प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.

फोंडाघाट येथील महावितरणसंबंधी प्रश्न पवन भालेकर यांनी, तर कळसुली विभागातील प्रश्न लक्ष्मण गावडे यांनी उपस्थित केले. कलमठसाठी स्वतंत्र फिडरचे काम केल्याबद्दल गुरुनाथ वर्देकर यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ओझरम परिसरात विजेचे खांब पडल्याचा प्रश्न सहदेव खाड्ये यांनी उपस्थित केला.

रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी तसेच ट्री कटिंगचे काम ग्रामीण भागात अपूर्ण असून ते लवकर पूर्ण करावे, अशी मागणी राजेश सावंत यांनी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही वीज वाहिन्यांवरील ट्री कटिंग करण्याची सूचना त्यांनी केली. विद्युत खांबांना अर्थिंग द्यावे. अन्यथा नागरिक तसेच जनावरे वीजेच्या धक्क्याने दगावण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदारांना तशा सक्त सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी लक्ष्मण गावडे, सहदेव खाड्ये यांच्यासह अन्य सदस्यांनी केली.

महामार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृतरित्या वाहने पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत १२५ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी दिली. ओसरगाव टोल नाका परिसरात पाच ते सहा वाहतूक पोलीस कायम थांबून असतात. ते वाहनचालकांवर कोणती कारवाई करतात, असा प्रश्न लक्ष्मण गावडे यांनी उपस्थित केला. फोंडाघाट येथे ग्रामस्थांची तक्रार नोंदवून घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पवन भालेकर यांनी केली.

तालुक्यातील दूध उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी राजेश जाधव यांनी केली. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडी तोडणे तसेच पाण्याचा निचरा करणे अशा विविध कामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे. या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे त्यावर नियंत्रण असावे, असे राजेश सावंत यांनी सांगितले. याबाबत काळजी घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गावातील रस्ते तयार केल्यानंतर संबंधित रस्त्यांच्या कामांचा मेंटेनन्स संबंधित ठेकेदाराने पाच वर्षे करणे अपेक्षित आहे. मात्र त्यानंतर त्या कामांचा मेंटेनन्स कोण करणार, असा तांत्रिक मुद्दाही या सभेत उपस्थित झाला.

तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करत पारितोषिके प्राप्त केली आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या अभिनंदनाचा ठराव लक्ष्मण गावडे यांनी मांडला. पंचायत समितीच्या सभेत शाळा क्रमांक ३च्या विद्यार्थ्यांच्या यशाची व शिक्षकांच्या मेहनतीची विशेष दखल घेण्यात आली.

वरवडे-फणसवाडी शाळा परिसरात बहुउद्देशीय इमारत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात येणार आहे. त्याला ना हरकत देण्याचा ठराव या सभेत घेण्यात आला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील शवपेटी कार्यान्वित करण्यासाठी विद्युत जोडणी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी सहदेव खाड्ये यांनी केली. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत पत्र तयार करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले. तापसरीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क असून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा इंगोले यांनी सांगितले.

चौकट

पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव

पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित राहावे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करून लोकांचे प्रश्न कसे सुटतील, याबाबत नियोजन करूया, असे आवाहन राजेश सावंत यांनी केले. या सभेत विविध विभागांचे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. तसेच हळवल रेल्वे उड्डाणपूल जोड रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव लक्ष्मण गावडे यांनी मांडला.

You cannot copy content of this page