Headlines

गणेशोत्सवपूर्व तयारीला कुडाळ नगरपंचायतीचा वेग…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर ऑन फिल्ड:न.प.चे विविध विभाग फिल्डवर सक्रिय..

⚡कुडाळ ता.२६-: आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम आणि सुरळीत ठेवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने पूर्वतयारीला वेग दिला आहे. नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे विविध विभाग समन्वयाने फिल्डवर उतरले असून, गणेशोत्सवापूर्वी आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.
नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाकडून शहरातील खड्डे बुजविण्याबरोबरच कुडाळ हायस्कूल परिसरातील साईडपट्टी सुस्थितीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात नागरिक, चाकरमानी आणि भाविकांना वाहतुकीस कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रस्ते व सार्वजनिक सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
आरोग्य विभागाकडून शहरातील झाडी कटिंग, अंतर्गत रस्ते तसेच गणेश घाटाकडे जाणाऱ्या पायवाटांची स्वच्छता आणि फॉगिंगची कामे सुरू करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या काळात शहरात स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण राहावे, यासाठी स्वच्छता उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे.
नगरपंचायतीचा विद्युत विभागही सक्रिय झाला असून शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती, हायमास्टची देखभाल तसेच आवश्यक विद्युत सुविधांची तपासणी करण्यात येत आहे. उत्सव काळात शहरातील प्रमुख ठिकाणी प्रकाशव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
याबाबत नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी सांगितले की, “गणेशोत्सव २०२६ साठी कुडाळ शहरातील नागरिक, चाकरमानी, पर्यटक आणि भाविकांना उत्तम नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत पूर्णपणे दक्ष आहे. सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवून पूर्वतयारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
नगराध्यक्षांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील पूर्वतयारीला वेग आला असून, स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज होत आहे.

You cannot copy content of this page