चौकुळ जि. प. केंद्र प्राथमिक शाळेत विशेष राखी निर्मिती व ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम..
⚡आंबोली ता.२६-: श्रमातून कौशल्य, कौशल्यातून स्वावलंबन आणि स्वावलंबनातून आनंद या ब्रीदवाक्याने जि. प. केंद्र प्राथमिक शाळा चौकुळ नं. १ येथे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता, श्रमप्रतिष्ठा आणि देशप्रेमाची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने ‘श्रमातून आनंद’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक व कलात्मक राख्या तयार केल्या. या राख्यांची आठवडा बाजारात विक्री करण्यात आली.
त्याचबरोबर देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रमही राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या कल्पकतेतून विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या. स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, श्रमाची प्रतिष्ठा आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली.
शाळेचे मुख्याध्यापक शितल गावडे, उपशिक्षक गणपती पाटील, पदवीधर शिक्षक गोविंद पाटील व किरण माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत चौकुळचे प्रशासक गुलाबराव नारायण गावडे तसेच पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे तसेच शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यामध्ये श्रमसंस्कार, उद्योजकतेची बीजे आणि देशप्रेमाची भावना रुजविणारा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला.
