चार बंदुका, तीन जिवंत काडतुसे व खवले मांजराचे खवले जप्त:गुप्त माहितीच्या आधारे तीन ठिकाणी पहाटे छापे..
⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे देवसु गावात एक मोठी कारवाई केली. भल्या पहाटे सात वाजताच्या सुमारास देवसु गावातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी चार बंदुका जप्त केल्या असून त्यात काडतुसाच्या तसेच ठाचणीच्या बंदुकांचा समावेश आहे.
या धाडीदरम्यान केवळ बेकायदेशीर शस्त्रेच नव्हे, तर इतर बेकायदेशीर साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे. कारवाईत तीन जिवंत काडतुसे आणि अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराची एक किलो खवले जप्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. देवसु गावात पहाटेच्या सुमारास पार पडलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि वन्यजीवांच्या अवयवांची तस्करीत सहभाग असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून, यामागे आणखी कोणाचे रॅकेट आहे का या दृष्टीने सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
