Headlines

सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये…

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या आदेशाने सावंतवाडीत खड्डे बुजवण्यासह स्ट्रीट लाईटच्या कामाला वेग..

⚡सावंतवाडी ता.०३-: गणेश चतुर्थीच्या काळापासून सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या दुरवस्थेवरून सावंतवाडी नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत होते. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असतानाही या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र होते. मात्र, अखेर या गंभीर परिस्थितीची दखल घेत सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रशासनाला तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार शहरातील मुख्य बाजारपेठेत खड्डे बुजवण्याच्या कामाला शीघ्र गतीने प्रारंभ झाला आहे.
दरम्यान, सावंतवाडी शहरातील मोर डोंगरी परिसरात रस्त्याला पडलेले खड्डे आणि चरामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला होता. उपनगराध्यक्ष निरवडेकर यांनी या विषयात तत्काळ हस्तक्षेप करत शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले, ज्यामुळे मुख्य रस्त्यांवरील काम आता वेगाने सुरू झाले आहे.
खड्ड्यांबरोबरच शहरातील विविध भागांत स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातच चाचपडत प्रवास करावा लागत होता. अशाच एका घटनेत सर्वोदय नगर भागात घराबाहेर खुर्चीवर बसलेल्या एका नागरिकाला अंधारामुळे ‘फुरसे’ या विषारी सरपटणाऱ्या प्राण्याने दंश केला. या गंभीर घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन उपनगराध्यक्षांनी सर्वोदय नगर परिसरासह कंटक पांदण आणि माठेवाडा परिसरातील अंधारमय भागांमध्ये तातडीने नवीन स्ट्रीट लाईट बसवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. निरवडेकर यांच्या आदेशानंतर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करत पथदिवे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या खड्डे आणि अंधाराच्या समस्येवर तातडीने उपाययोजना सुरू झाल्यामुळे सावंतवाडीतील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत श्री देव नारायण मंदिरासमोरील मोठमोठे खड्डे बुजवताना नगरपरिषदेचे कर्मचारी

You cannot copy content of this page